Donald Trump on India: 'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
Donald Trump on PM Modi: आतापर्यंत किमान 35 हून अधिकवेळा ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र, टॅरिफची धमकी दिल्याचा दावा पहिल्यांदाच केला आहे.

Donald Trump on PM Modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करून अणुयुद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. युद्ध सुरु असताना मी आपल्यासोबत डील करणार नाही, असे मोदींना फोन करून सांगितले होते. तुम्ही अणुयुद्धाकडे जात आहात. आम्ही तुमच्यावर असा टॅरिफ लावू की तुमचं डोकं गरगर करायला लागेल, असा सनसनाटी दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आतापर्यंत किमान 35 हून अधिकवेळा ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र, टॅरिफची धमकी दिल्याचा दावा पहिल्यांदाच केला आहे.
भारतावर भारी शुल्क लादण्याची धमकी दिली
बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प म्हणाले की त्यांनी भारतावर भारी शुल्क लादण्याची धमकी दिली होती. त्यांनी दोन्ही देशांमधील वाद मिटल्याशिवाय व्यापार करार थांबवण्याबाबतही बोलले. ट्रम्प यांनी दावा केला की दोन्ही देशांनी त्यांच्या संभाषणानंतर अवघ्या पाच तासांत माघार घेतली. तथापि, भारताने ट्रम्प यांचे चर्चा आणि मध्यस्थीचे दावे नेहमीच नाकारले आहेत. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के शुल्क लादलं असन जे आजपासून (27 ऑगस्ट) गू झाले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी जुलैमध्ये भारतावर 25 टक्के शुल्क लादले होते, आता भारतावरील एकूण शुल्क 50 टक्के झाले आहे.
15 कोटी डॉलर्स किमतीचे 7 विमान पाडल्याचा दावा
ट्रम्प म्हणाले, 'मी मोदींशी बोललो, जे खूप चांगले व्यक्ती आहेत. मी विचारले की भारत आणि पाकिस्तानमध्ये काय चालले आहे. दोघांमध्ये खूप द्वेष होता. हा वाद बराच काळ चालू आहे.' ते म्हणाले की, 'हा विषय सुटला आहे. आता कदाचित ते पुन्हा सुरू होईल, मला माहित नाही. पण जर ते झाले तर मी ते पुन्हा थांबवेन. आपण अशा गोष्टी घडू देऊ शकत नाही.' ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की या तणावात अनेक जेट विमाने पाडण्यात आली. ते म्हणाले, 'हे चांगले नाही. 15 कोटी डॉलर्स किंमतीची विमाने पाडण्यात आली, कदाचित सात किंवा त्याहून अधिक, खरा आकडा कधीच उघड करण्यात आला नाही.' तथापि, त्यांनी यासाठी कोणताही पुरावा किंवा अधिकृत स्रोत दिला नाही.
भारत-पाकिस्तान वादाची तुलना रशिया-युक्रेन युद्धाशी
रशिया-युक्रेन युद्धाशी तुलना करताना ट्रम्प म्हणाले की भारत-पाकिस्तान वाद देखील जागतिक संकटात बदलू शकतो. ते म्हणाले, 'जसे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जगाला महायुद्धात ओढू शकते, तसेच भारत आणि पाकिस्तानमधील वाद अणुयुद्धात बदलू शकतो.' ट्रम्प यांनी यापूर्वी असे दावे केले आहेत की त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील मोठे युद्ध रोखले गेले. तथापि, भारताने वारंवार कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला नकार दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की युद्धबंदी ही भारताच्या स्वतःच्या धोरणात्मक निर्णयांचा परिणाम आहे आणि त्यात कोणताही बाह्य दबाव नव्हता. पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात संसदेत स्पष्टपणे सांगितले होते की कोणताही तृतीय पक्ष मध्यस्थी नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही हीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे.
जेडी व्हान्स म्हणाले - टॅरिफ वॉर थांबवण्याची रणनीती
ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्स कमावले आणि त्याच रणनीतीने युद्ध थांबवले. ट्रम्प यांच्यापूर्वी, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले होते की भारतावर लादलेले दुय्यम कर देखील वॉशिंग्टनच्या त्याच रणनीतीचा भाग आहेत. एनबीसी न्यूजच्या 'मीट द प्रेस'शी बोलताना व्हॅन्स म्हणाले की, ट्रम्प प्रशासन भारतावर कर लादण्यासह उपाययोजना करून रशियाला त्यांच्या तेल अर्थव्यवस्थेतून नफा मिळवणे कठीण करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















