Iran Israel War: अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?
Iran Israel War: इस्रायलवरील पोलादी छत. एआयचा वापर करुन आयर्न डोम ही प्रणाली शत्रूची क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट करते. ही हवाई सुरक्षायंत्रणा आतापर्यंत जगातील अभेद्य अशी यंत्रणा म्हणून ओळखली जात होती.

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेला लष्करी संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. अत्याधुनिक शस्त्रं आणि लष्करी ताकद असलेल्या इस्रायलने आतापर्यंत इराणची (Iran) राजधानी असलेल्या तेहरानसह देशातील महत्त्वाचे लष्करी तळ आणि आस्थापने नष्ट केली आहेत. मात्र, इराणकडूनही इस्रायलच्या (Israel) या हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणकडून इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अविव शहरावर सातत्याने क्षेपणास्त्रांचा मारा सुरु आहे. सोमवारी पहाटे इराणने इस्रायलच्या प्रमुख शहरांमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. इस्रायलचे जगविख्यात आयर्न डोम (Iron dome) हे सुरक्षाकवच भेदून इराणची अनेक क्षेपणास्त्रं अचूक लक्ष्यावर जाऊन आदळली. त्यामुळे आयर्न डोम प्रणालीच्या उपयुक्ततेबाबत चर्चा सुरु झाली आहे.
इराणच्या 'रिव्हॉल्युशनरी गार्ड'कडून आयर्न डोम प्रणाली भेदण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे तंत्र नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामुळे इस्रायलची बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा एकमेकांनाच लक्ष्य करत असून इराणची क्षेपणास्त्र मात्र इस्रायलमध्ये जाऊन कोसळत आहेत, असा दावा इराणी लष्कराने केला. आतापर्यंत इस्रायलने अनेकदा आपल्या आयर्न डोम प्रणालीचा मोठा गवगवा केला आहे. मात्र, इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये झालेले नुकसान पाहता आयर्न डोम प्रणाली 100 टक्के सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे इस्रायलमधील नागरिकांची चिंता वाढली आहे.
Iran missile attack on Israel: इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा
इस्रायलने इराणच्या अणु, लष्करी आणि तेल-वायू तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले, ज्याला "ऑपरेशन रायझिंग लायन" असे नाव देण्यात आले. प्रत्युत्तर म्हणून, इराणने 14 जून 2025 रोजी इस्रायलवर 100हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. त्या वेळी आकाशात असलेल्या एका व्यावसायिक विमानातून या हल्ल्यांचे एक अनोखे दृश्य टिपले गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये इराणी क्षेपणास्त्रे आकाशात दिसत आहेत.
इराणने इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेम आणि दिमोना येथील अणुभट्टीला लक्ष्य केले होते. इराणकडून मारा करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये फतेह-1, फतेह-2, खोरमशहर-4, इमाद आणि कादरसारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे समाविष्ट होती. यापैकी काही क्षेपणास्त्रे हायपरसोनिक होती. या क्षेपणास्त्रांचा वेग 13 ते 15 मॅक ( 15 हजार ते 18 हजार किलोमीटर प्रतितास) इतका आहे. इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने यापैकी अनेक क्षेपणास्त्रं नष्ट केली. तरी काही क्षेपणास्त्रं ही इस्रायलमध्ये कोसळली आहेत.
आणखी वाचा























