Hawaii Wildfires : हवाई बेट आगीच्या भक्ष्यस्थानी! अमेरिकेच्या बेटावर जंगलात वणवा, भीषण आगीत 80 जणांचा मृत्यू तर शेकडो नागरिक बेपत्ता
US Hawaii Wild Fire : अमेरिकेतील हवाई बेटांवर जंगलात लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या 80 वर पोहोचली आहे. शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत.
हवाई, यूएस : अमेरिकेच्या (America) हवाई बेटांवर (Hawaii Island) असलेल्या जंगलातील वणवा (Wildfire) थांबवण्याचं नाव घेत नाही. जंगलात भीषण आग लागली असून या वणव्यामुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच शेकडो लोक अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. वणव्यामुळे लहैना हे ऐतिहासिक शहर जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झालं आहे. अग्निशमन दल लहैनासह अनेक भागात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या परिस्थितीत प्रशासनानवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या का, नागरिकांना वाचवण्याच्या शक्यतांबाबत चौकशी केली जात आहे.
अमेरिकेच्या बेटावर भीषण आग
अमेरिकेतील हवाई बेटांवर जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. येथील जंगलाला लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या 80 वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक भागात अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
लहेना शहर पूर्णपणे उद्ध्वस्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोध पथके अजूनही बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे लहेना शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात समोर आलं आहे. शहरातील एक हजाराहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी सीएनएनला माहिती देताना सांगितलं की, बहुतेक मृत्यू आगीत जळल्यामुळे झाले आहेत. सर्व मृत्यू बाहेरीत भागात, उघड्यावर झाले आहेत. कारण, आगीच्या भीतीने लोक आधीच घराबाहेर पडले होते.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, चौकशी होणार
हवाईच्या ऍटर्नी जनरलने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी वणवा पसरल्यावर किती जलद आणि कशाप्रकारे प्रतिसाद दिला याची चौकशी केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना वणव्याबद्दल पुरेसा जलद इशारा दिला की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. गव्हर्नर जोश ग्रीन म्हणाले की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही राज्याच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती!
याआधी 1961 मध्ये झालेल्या आपत्तीत राज्यात 61 लोकांचा मृत्यू झाला होता. अहवालानुसार, गव्हर्नर यांनी सांगितलं की, "मी आज सकाळी एक आढावा बैठक घेतली, त्या दरम्यान आम्ही अधिकार्यांना नेमकं काय घडलं आणि कसं घडलं याची तपशीलवार माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.