अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा निर्णय, माजी पोलिस अधिकारी डेरेक चौविन याला जॉर्ज फ्लॉईड हत्येप्रकरणात 22 वर्ष 5 महिन्यांचा तुरूंगवास
वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी कोर्टाने मिनियापोलिसचे माजी पोलिस अधिकारी डेरेक चौविन यांना कृष्णवर्णीय नागरीक जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. जॉर्ज फ्लॉयड हत्येप्रकरणी चौवीनला दोषी आढळल्यानंतर न्यायाधीश पीटर ए. कॅसिल यांनी 22 वर्ष 5 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.
वॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉईड हत्येच्या प्रकरणात अमेरिकेच्या एका कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यापूर्वी वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी कोर्टाने मिनियापोलिसचे माजी पोलिस अधिकारी डेरेक चौविन यांना कृष्णवर्णीय नागरीक जॉर्ज फ्लॉईडची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवले होते. या प्रकरणात दोषी ठरलेल्या मिनियापोलिसचे माजी पोलिस अधिकारी डेरेक चौविन यांना 22.5 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेल्या वर्षी पोलीस अधिकारी चौविनने फ्लॉईडचा गुडघ्याने गळा दाबल्याने मृत्यू झाला होता. या घटनेच्या व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले होते. एका वृत्तपत्रानुसार असे म्हटले जात आहे की फिर्यादींनी 30 वर्षांची शिक्षा मागितली होती. मात्र, चौविन यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. त्यामुळे न्यायाधीशांना 10 वर्ष ते 15 वर्षे दरम्यान शिक्षा ठोठावण्याचा सल्ला देण्यात आला होता.
22 वर्ष 5 महिन्यांची शिक्षा
न्यूयॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीश पीटर ए. काहिल यांनी चौविनला शिक्षा सुनावण्यापूर्वी सांगितले होते की, त्याची शिक्षा भावनांवर आधारित नाही. मात्र, ते पुढे म्हणाले की, "मला त्या संवेदनांचा स्वीकार करायचा आहे, जो प्रत्येक कुटुंब अनुभवत आहे, खासकरुन फ्लॉईडचे कुटुंब" अशातच न्यायाधीशांनी चौविनला 22 वर्षे 5 महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.
चौविनने फ्लॉईड कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केल्या
यापूर्वी एप्रिलमध्ये चौविनला सेकेंड-डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि सेकेंड-डिग्री मानवहत्येसाठी दोषी ठरविण्यात आले होते. त्याला सेकेंड-डिग्री हत्येप्रकरणी 40 वर्षापर्यंत, थर्ड-डिग्री मर्डरसाठी 25 वर्षांपर्यंत आणि हत्येप्रकरणी 10 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात थोडक्यात बोलताना चौविन यांनी फ्लॉईडच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली. तो म्हणाला, 'मला फ्लॉईड कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त करायचा आहे.'
जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार
जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. अमेरिकेत झालेला हा हिंसाचार मागील अनेक दशकांपासूनचा सर्वात मोठा हिंसाचार मानला गेला आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा हिंसाचार अमेरिकेतील कमीत कमी 140 शहरांपर्यंत पसरला होता. जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूसंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जॉर्ज यांच्या मानेवर जवळपास 9 मिनिटांपर्यंत आपला गुडघा ठेवून होता. त्यावेळी जॉर्ज अनेकदा ते श्वास घेऊ शकत नसल्याचंही सांगत होते. हा व्हिडीओ जगभर पसरल्याने अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली. भारतातूनही या आंदोलनाला पाठींबा मिळाला होता.