दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला दणका, ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन
FATF ने गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं. ऑक्टोबरपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास काळ्या यादीत टाकलं जाईल, असा इशारा FATF ने पाकिस्तानला दिला आहे.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानचं नाव FATF म्हणजे फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीत समाविष्ट होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडनेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. फ्लोरिडातील FATF च्या बैठकीत पाकिस्तान दहशतवादाविरोधात कारवाई करत नसल्याचं अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं म्हटलं आहे. मलेशिया, तुर्की आणि चीनच्या समर्थनामुळे पाकिस्तान ग्रे लिस्टच्या खाली येऊ शकला नाही. मात्र जर पाकिस्तानला 3 देशांचं समर्थन मिळालं नसतं तर FATF नं पाकिस्तानचं नाव थेट काळ्या यादीत टाकलं असतं.
FATF ने गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं. ऑक्टोबरपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास काळ्या यादीत टाकलं जाईल, असा इशारा FATF ने पाकिस्तानला दिला आहे. टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग विरोधात काम करणाऱ्या FATF ने पाकिस्तानला बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यावर विचार करण्यास सांगितलं आहे.
याआधी पाकिस्तानला जानेवारी 2019 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदत 2019 पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र पाकिस्तानमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता FATF नं पाकिस्तानला शेवटची संधी दिली आहे.