(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुर्की, ग्रीसमध्ये भूकंपाने हाहाकार; 22 ठार तर 700 हून अधिक जखमी
तुर्की, ग्रीसमध्ये 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त, 22 जणांचा मृत्यू तर 700 हून अधिक जखमी
Turkey and Greece earthquake: तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी दरम्यान एजियन समुद्रात शुक्रवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला असून 700 हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्तांबूलमधील इजमीर जिल्ह्यात सेफेरिसारमध्येही सौम्य प्रमाणात त्सुनामीची लाट आली. त्याच वेळी ग्रीसच्या सामोस द्वीपकल्पात 4 लोक जखमी झाले आहेत.
युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने माहितीनुसार, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 6.9 असून त्याचा केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होता. तर अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7.0 इतकी होती. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार भूकंपाचे केंद्रस्थान एजियन समुद्रात 16.5 किमी खाली होते. भूकंपाची तीव्रता 6.6 नोंदवण्यात आली आहे.
PHOTO | तुर्कीतील भूकंपानंतरचे वेदनादायी चित्र
भूकंपात सर्वाधिक नुकसान तुर्कीच्या इजमीर शहरात झालं आहे. पश्चिम तुर्कीच्या इजमीर प्रांतातील अनेक इमारती भूकांपामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. बचाव कार्य करणारे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत. मध्य इज्मीरमध्ये अनेक ठिकाणी हवेत धूर पसरल्याचे फोटोही समोर आले आहेत.
ढिगाऱ्यातून जवळपास 70 जणांना बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती इजमीरचे राज्यपाल यावूज सलीम कोसगार यांनी दिली. तसेच अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व हेलिकॉप्टरचे सहाय्य घेतले जात आहे. इजमीरमध्ये 38 रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि 35 बचाव दल कार्यरत आहेत. किमान 12 इमारतींमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे.
जानेवारीमध्ये तुर्कीच्या सिव्रीस येथे झालेल्या भूकंपात 30 हून अधिक लोक ठार तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यापूर्वी 1999 साली तुर्कीच्या इजमित शहरात भूकंपात 17000 नागरिक ठार झाले होते.