डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मित्र डोनाल्ड, लवकर बरे व्हा!'
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण (Donald Trump Corona Positive) झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात. त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा.
Wishing my friend @POTUS @realDonaldTrump and @FLOTUS a quick recovery and good health. https://t.co/f3AOOHLpaQ
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2020
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.
Tonight, @FLOTUS and I tested positive for COVID-19. We will begin our quarantine and recovery process immediately. We will get through this TOGETHER!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्विट करत आपल्या सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण क्वारंटाईन होत असल्याची माहिती दिली होती. 'अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फर्स्ट लेडी आणि मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.
Hope Hicks, who has been working so hard without even taking a small break, has just tested positive for Covid 19. Terrible! The First Lady and I are waiting for our test results. In the meantime, we will begin our quarantine process!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण, पत्नी मेलेनियाही कोरोनाबाधित
मास्क घालायचं टाळायचे ट्रम्प कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मास्कची मला गरज वाटत नाही. मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती.
अमेरिकेत स्थिती गंभीर चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. आजघडीला अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7,494,671 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 212,660 जणांना जीव गमावावा लागला आहे. तर 4,736,621 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 2,545,390 इतके आहेत.