
COVID-19 Symptoms List | कोविड-19 ची तीन नवीन लक्षणे समोर!
आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता या यादीत अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने आणखी तीन लक्षणांचा समावेश केला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासह नवी लक्षणेही समोर आली आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना व्हायरसचे संभाव्य संकेत मान्य केले आहेत.
कोरोना व्हायरचे ही तीन नवीन लक्षणे आहेत - नाक वाहणे, मळमळ होणे आणि अतिसार.
नाक वाहणे सीडीसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचं नाव सातत्याने वाहत असेल आणि त्याला अस्वस्थ वाटत असेल, शिवाय ताप नसेल तरीही अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी.
मळमळ होणे मळमळ होणं हे कोरोनाचं आणखी एक लक्षण असल्याचं अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखं वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करायला हवं. मात्र मळमळ होण्याची इतर कारणंही असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करु नये. सातत्याने असं होत असल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी.
अतिसार कोरोना तिसरं नवं लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांनी याआधीही मान्य केलं होतं की कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षणे असतात. आता सीडीसीनेही मान्य केलं आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळले आहेत.
कोरोनाची आता 11 लक्षणे या तीन नवीन लक्षणांसह सीडीसीच्या यादीत कोरोना व्हायरसची एकूण 11 लक्षणे झाली आहेत. यापूर्वी शरीरात होणारे आठ बदल हे कोरोनाचे संभाव्य संकेत समजले जात होते. ताप आणि थंडी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चव न कळणे, घसादुखी आणि खवखव यांचा आठ लक्षणांमध्ये समावेश आहे.
कोरोनाबाधित रुग्ण इतरांनाही संक्रमित करु शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. वयोवृद्ध लोकांनी तसंच ज्यांना दमा, मधुमेह, हृदयविकार आहेत, त्यांच्यासाठीही कोरोना व्हायरस घातक ठरु शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्षणे ओळखणं अतिशय आवश्यक आहेत. लक्षणे ओळखूनच व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतो.
असिम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या जास्त सुमारे 45 टक्के कोरोनाबाधित हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
भारतात सव्वा पाच लाख कोरोनाबाधित भारतात सव्वा पाच लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 16 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर जगभरात एक कोटींपेक्षा जास्त जण कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
