Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषबाधा? व्याही जावेद मियांदादची पहिली प्रतिक्रिया
Dawood Ibrahim Health Updates : दाऊद इब्राहिमच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे दाऊदचा व्याही जावेद मियांदादने प्रतिक्रिया दिली आहे.
Dawood Ibrahim : भारताचा मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर (Socail Media) या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी हिनेदेखील दाऊद इब्राहिमला विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला होता. दाऊदच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे 'एबीपी न्यूज'ने दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादसोबत संवाद साधला.
जावेद मियांदादच्या मुलाने दाऊद इब्राहिमच्या मुलीसोबत विवाह केला आहे. 2005 मध्ये झालेल्या या विवाहाची चर्चा भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यावेळी दाऊदचा फोटो समोर आला नव्हता. दाऊद इब्राहिम हा शेवटची घटका मोजत असून पाकिस्तान सरकारने हे वृत्त दाबले असल्याची चर्चा सुरू होती. पाकिस्तान सरकारने जावेद मियांदाद यालाही नजरकैदेत ठेवले असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, एबीपी न्यूजसोबत बोलताना जावेद मियांदाद याने या वृ्त्ताचे खंडन केले आहे. आपल्याला कोणीही नजरकैदैत ठेवले नसल्याचे त्याने म्हटले आहे. जावेद मियांदादने दाऊदच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.
जावेद मियांदादने एबीपी न्यूजला सांगितले की, दाऊद इब्राहिमवर मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर मी काहीही बोलणार नाही. दाऊदवर जे काही बोलायचे ते पाकिस्तान सरकार सांगेल, असेही त्याने स्पष्ट केले.
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमीचाही होता असा दावा
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये अशी चर्चा आहे की दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो कराचीतील रुग्णालयात मृत्यूसोबत झुंजत आहे. या वृत्ताला दुजोरा देण्याचे धाडस पाकिस्तानात कोणाचेही नाही. कोणीही त्याबाबत भाष्य केल्यास त्याच्यावर कारवाई होईल असेही काझमीने म्हटले होते.
आरजू काझमी म्हणाल्या की, जर कोणी या बातमीला दुजोरा दिला किंवा प्रयत्नही केला तर तो अडचणीत येईल. जावेद मियांदाद यांच्याशी झालेल्या संभाषणातही त्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या बातम्यांना दुजोरा देण्यास नकार दिला.
दाऊद इब्राहिमच्या प्रकृतीबाबत काय वृत्त होते?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.