Coronavirus updates : WHO ने दिला इशारा, या देशांमध्ये वाढू शकते कोरोनाबाधितांची संख्या
WHO On Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महासाथीवर जगाला इशारा दिला आहे. येत्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार आहे.
WHO on Coronavirus : कोरोना महासाथीने मागील दोन वर्षापासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक देशांना दिलासा मिळाला होता. आता मात्र जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला असून येत्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते.
आशियाई देशांना धोका
वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते. कोरोना चाचणीचे प्रमाण कमी झाले असून मागील काही आठवड्यात कमी प्रकरणांची नोंद केली जात आहे. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, आशिया खंडातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. काही देशांमध्ये बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
चीनमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढले आहे. काही शहरांमध्ये लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. तर, इतर शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीनमध्ये ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 ची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार घातक नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, वेगाने फैलावत आहे. चीनशिवाय इतर देशातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटने जगाला हैराण केले आहे. ओमायक्रॉननंतर आता आलेल्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. इस्रायलमध्ये या नव्या व्हेरिएंटचे दोन बाधित आढळले आहेत. तर, कोरोनाचा नवा व्हेरिएंट कोव्हिडचा उपप्रकार BA.1 आणि BA.2 पासून तयार झाला आहे. सध्या या व्हेरिएंटबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
भारतात अलर्ट
जगभरातील देशांमधील कोरोना परिस्थिती पाहता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत बैठका सुरू आहेत. सध्या तरी देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे.