Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही, डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावात WHO चं स्पष्टीकरण
Corona Vaccine : सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेलं आहे.
Corona Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही. WHO नं बुधवारी म्हटलं की, सर्वात आधी सर्वात सर्वात आधी आपल्याला जगातील गरीब देशांना पूर्णपणे लसवंत करण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे.
WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं की, "कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की, सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे." दरम्यान, अमेरिकेनं 20 सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारनं डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं हा निर्णय घेतला आहे.
योग्य संख्येत, योग्य ठिकाणी लस पोहोचत नाही
डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी श्रीमंत देशांमध्ये कोरोना लसीच्या बूस्टर डोस देण्याबाबत म्हटलं की, "जगभरात सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. चिंतेचं कारण म्हणजे, लस योग्य संख्येत, योग्य ठिकाणी पोहोचत नाही."
त्यासोबतच त्यांनी म्हटलं आहे की, "गरीब देशांमधील सर्वांचं जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. दरम्यान, गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत."
गरीब देशांमध्ये लसीकरणाची परिस्थिती गंभीर
WHO नं दिलेल्या माहितीनुसार, जगातील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, मे महिन्यात प्रत्येक 100 लोकांसाठी सरासरी 50 डोस उपलब्ध होते आणि त्यानंतर आतापर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. तेच जर कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत बोलायचं झालं तर, इथे पुरवठ्याच्या कमतरतेमुळे प्रत्येक 100 लोकांपाठी लसीची मात्रा सरासरी 1.5 डोस इतकी आहे. दरम्यान, WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस घेतल्यानं कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होईल, असंही अद्याप सिद्ध झालेलं नाही.