Corona Outbreak : कोरोनामुळे चीनचे जनजीवन विस्कळीत, औषधांचा मोठा तुटवडा, भारत करणार मदत
India Helps China : अशा संकटसमयी, आपला शेजारी देश संकटात सापडलेला पाहून भारत पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.
Corona Outbreak : चीनमध्ये (China) कोरोनाची चौथी आणि सर्वात धोकादायक लाट (Coronavirus) आल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज लाखो नवीन रुग्ण सापडत असल्याने तसेच रुग्णालयात बेड मिळत नाहीत. अशातच आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाला असून, औषधांविना नागरिकांचे हाल होत आहेत. आपला शेजारी देश संकटात सापडलेला पाहून भारत (India) पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.
भारताचा चीनला मदत करण्याचा निर्णय
कोरोनाची आतापर्यंतची सर्वात घातक लाट चीनमध्ये आली असून रुग्णांना रुग्णालयात खाटाच मिळत नाहीत, तसेच औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. यामुळे भारताने चीनला औषधे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या औषध निर्यात संस्थेच्या अध्यक्षांनी गुरुवारी सांगितले की, जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादकांपैकी एक असलेल्या भारताने अशा प्रसंगी चीनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत चीनला तापाची औषधे देण्यास तयार आहे.
औषध कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम
चीनमध्ये कोरोनाच्या लाटेमुळे औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी औषध कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम केला जात आहे. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीवर मोफत औषधे देण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर चीनला तापावरील औषधे पाठवण्यास भारताने परवानगी दिली आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष साहिल मुंजाल यांनी रॉयटर्सला सांगितले की, "आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना चीनकडून ऑर्डर मिळत आहेत."
'या' औषधांची सध्या चीनमध्ये जास्त मागणी
मुंजाल म्हणाले, "आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या चीनमध्ये जास्त मागणी आहे, तर भारत चीनला मदत करण्यास तयार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले,'आम्ही चीनमधील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.' चीनला औषध पाठवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, "आम्ही इतर देशांनाही नेहमीच मदत केली आहे."
चिनी बाजारपेठेत औषधांचा तुटवडा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या बाजारात अँटी-व्हायरल औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल यांसारख्या अँटीव्हायरल औषधांच्या कमतरता जाणवत आहे. अहवालानुसार, विषाणूजन्य औषधांचा कमी पुरवठा आणि साठेबाजीमुळे चिनी बाजारपेठेत औषधांचा तुटवडा निर्माण झाला. चिनी सोशल मीडिया पोस्ट आणि वृत्तपत्रातील अहवाल असे सूचित करतात की, चिनी लोक औषधांसाठी ऑनलाइन स्टोअर्सची मदत घेत आहेत.
औषधांचा काळाबाजार सुरू
शांघायमधील 'द पेपर' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीनमध्ये अनेक एजंट सक्रिय झाले आहेत, जे विषाणूजन्य तापाची औषधे दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकत आहेत. पेपरमध्ये लिहिले आहे की, एका एजंटने परदेशी जेनेरिक अँटीव्हायरलच्या 50,000 हून अधिक बॉक्स विकले आहेत. ग्वांगझू डेली वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ग्वांगझू युनायटेड फॅमिली हॉस्पिटलमध्ये विषाणूजन्य औषध पॅक्सलोव्हिडची किंमत सुमारे 2,300 युआन आहे. कोरोना बाधित आढळल्यानंतरच हे औषध रुग्णांना दिले जात आहे. रूग्णांच्या सीटी स्क्रीनिंगचा खर्च रूग्णालयात 5 हजार युआन आहे. 1,000 युआन ही डॉक्टरची फी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या