Abu Saifullah: लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा, मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा पाकिस्तानच्या सिंध प्रांतात खेळ खल्लास
Abu Saifullah : लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा करण्यात आला आहे. नागपूरमध्ये 2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा कट त्यानं रचलेला.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून न सावरलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. नागपूरच्या आरएसएसच्या मुख्यालयावर 2006 मध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा लष्कर-ए-तोयबाचा कंमांडर अबू सैफुल्लाह मारला गेला आहे. अबू सैफुल्लाह याला अज्ञात हल्लेखोरांकडून संपवण्यात आलं आहे. अबू सैफुल्लाह नेपाळमध्ये दहशतवाद्यांचं नेटवर्क चालवायचा. भारतात झालेल्या तीन दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता.
पाकिस्तानमधील टेरर नेटवर्कला मोठा दणका बसला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाहचा सिंधमध्ये खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याची हत्या कुणी केली हे अजून कळू शकलेलं नाही. लष्कर-ए-तोयबा आणि अन्य अतिरेकी संघटनांच्या कृत्यांमध्ये तो आर्थिक सहाय्य करायचा. अबू सैफुल्लाहचा भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात होता.
लष्कर-ए- तोयबाच्या या दहशतवाद्याचं नाव अबू सैफुल्लाह उर्फ मोहम्मद सलीम उर्फ राजुल्लाह निजामनी हे होतं. लष्कर-ए-तोयबाच्या नेपाळमधील मॉड्यूलची जबाबदारी तो सांभाळत होता. याचं मुख्य काम लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कृत्यांना केडर आणि आर्थिक मदत करणं हे होतं.
अबू सैफुल्लाह नेपाळमार्गे भारतात दहशतवादी पाठवत असे. 2001 मधील सीआरपीएफ कॅम्प रामपूर दहशतवादी हल्ला 2005 मधील बंगळूरूमधील दहशतवादी हल्ला आणि 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाजवळ झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमांईड होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते नेपाळमध्ये राहत होता. नोपाळमध्ये तो ओळख बदलून राहायचा, तिथं त्यानं एका स्थानिक महिलेशी विवाह देखील केला होता.
अबू सैफुल्लाह कोण होता?
लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह हा भारतात दहशतवादी हल्ले करण्यात काम करत होता. अबू सैफुल्लाह उर्फ मोहम्मद सलीम यानं नेपाळमध्ये दहशतवादी नेटवर्क पसरवलं होतं. तिथून तो भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणयचा.
भारतीय तपास यंत्रणांनी अबू सैफुल्लाह याला मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं होतं. त्यामुळं तो नेपाळ सोडून पाकिस्तानमध्ये गेला होता. पाकिस्तानातील अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.























