Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाडयन ( Joe Biden  ) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग  ( Xi Jinping) यांच्यामध्ये आज दूरध्वनीवरून संभाषण झाले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी चीनकडून रशियाला लष्करी आणि आर्थिक मदत देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात येत आहेत. चीन आणि अमेरिकेने मिळून शांततेसाठी आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे जिनपिंग यांनी या संभाषणात म्हटले आहे. 


'ईस्टर्न डेलाइट टाईम'नुसार, दोन्ही नेत्यांनी आज सकाळी 9 वाजून तीन मिनिटांनी चर्चा सुरू केली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी याबाबत सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चीनने पाठिंबा दिल्याबद्दल आणि युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल बाडन जिनपिंग यांना प्रश्न विचारतील. याबरोबरच चीनचे राष्ट्राध्य कोणाचे समर्थन करत आहेत याचे मूल्यांकन करण्याची ही संधी आहे," 


या संभाषणावेळी चीनने मानवतावादी मदतीसाठी चर्चा आणि अनुदान देण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवून रशियाला चिथावणी देत ​​संघर्ष वाढवत असल्याचा अमेरिकेवर आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी  सांगितले की, “चीनने प्रत्येक वेळी जीवितहानी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील सामान्य लोकांना कशाची जास्त गरज आहे? अन्न की मशीन गन? याचे उत्तर देणे सोपे आहे."


पुतिन यांनी युक्रेनमध्ये रशियन सैन्य तैनात केल्यानंतर जिनपिंग यांनी रशियाच्या आक्रमकतेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून जिनपिंग यांच्यासोबतचे त्यांचे हे चौथे संभाषण आहे. 


दरम्यान,  रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. रशियाचे आतापर्यंत 14 हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, अद्याप या संघर्षावर तोडगा निघालेला नाही.  


महत्वाच्या बातम्या