World Sleep Day 2022 : चांगली झोप माणसाचं उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यास खूप मदत करते. असं म्हणतात माणसाला अन्न, वस्त्र, निवारा आणि पुरेशी झोप मिळणं फार गरजेचे आहे. कारण यावरच माणसाचे मानसिक, शारीरिक संतुलन अवलंबून असते. आज जागतिक निद्रा दिन आहे. पहिल्यांदा निद्रा दिन 2008 मध्ये साजरा करण्यात आला. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु, हा दिवस नेमका का साजरा केला जातो. या मागची पार्श्वभूमी काय ते जाणून घ्या. 


जागतिक निद्रा दिन 2022 इतिहास (World Sleep Day 2022 History) :


वर्ल्ड स्लीप सोसायटी ही संस्था वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोकांना बर्‍याच आजारांना सामोरं जावं लागतं. अगदी नकळत या अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हे रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा करण्यास सुरुवात केली. आज जगातील 88 हून अधिक देशांमध्ये 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. पहिल्यांदा 2008 साली हा दिवस साजरा केला गेला. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वांना झोपेचं महत्त्व कळावं यासाठीचा हा एक प्रयत्न! 


जागतिक निद्रा दिन 2022 ची थीम (World Sleep Day 2022 Theme) : 


'क्वालिटी स्लीप, साउंड माईंड, हॅप्पी वर्ल्ड' ही या वर्षीच्या जागतिक निद्रा दिनाची थीम आहे. यामधून मन आणि शरीरावर झोपेचा काय परिणाम होतो हे अधोरेखित करण्यात आले आहे. 


जागतिक निद्रा दिनाचं महत्त्व (World Sleep Day 2022 Importance) : 


आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानावर चालणाऱ्या जगात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण या गोष्टी पूर्वीप्रमाणे वेळेवर होत नाहीतच पण त्यात व्यायामाकडेही दुर्लक्ष होतं. कामासाठीचा बराचसा वेळ घराबाहेरच गेल्याने बाहेरचं जंक फूड खाल्लं जातं. ऑफिसच्या कामाचा, इतर अनेक गोष्टींचा तणाव, त्यात झोपही पुरेशी मिळत नाही. ज्याचा थेट परिणाम विविध आजारांतून दिसतो. केवळ शरीरावरच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही याचा मोठा परिणाम होतो.


पुरेशी झोप शरीराला मिळाली की पाहा तुमचा दिवस किती आनंदित जाईल आणि तुम्ही संपूर्ण दिवस एनर्जेटिक राहाल! वर्ल्ड स्लीप सोसायटीचं झोपेबाबत जागरुकता करण्याचं हे पाऊल कौतुकास्पद आहे. सध्या वेग वाढलेल्या या जगातून थोडा वेळ काढत झोप पूर्ण करणं आणि स्वत:ला वेळ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हालाही जर आरोग्यदायी राहायचं असेल तर किमान आठ तासांची झोप पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आनंदी राहा! Happy World Sleep Day!


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha