USA help to Ukraine : रशियाच्या हल्ल्याला तोंड देत असलेल्या युक्रेनला अमेरिकेने लष्करी मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनसाठी 800 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 800 अॅण्टी एअरक्राफ्ट सिस्टम, 9000 अॅण्टी आर्मर सिस्टीम, 7000 स्मॉल आर्म्स आदी लष्करी उपकरणे अमेरिकन संरक्षण खात्याकडून युक्रेनला देण्यात येणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन संसदेत ही घोषणा केली. त्यांनी ही घोषणा करण्याआधी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी सर्व अमेरिकन खासदारांनी झेलेन्स्की यांना उभे राहून अभिवादन केले. झेलेन्स्की यांनी दुसऱ्या महायुद्धाची आठवण करून देत युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडीओ अमेरिकन संसदेत दाखवला. त्यांनी आम्हाला शांतता हवी आहे, हे युद्ध थांबण्यात यावे, अशी मागणी केली.
झेलेन्स्की यांनी नो-फ्लाय झोन जाहीर करण्याच्या मागणीवर जोर देण्याऐवजी रशियन फौजांकडून सुरू असलेले हल्ले रोखण्यासाठी लष्करी मदत मागितली. झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणा दरम्यान पर्ल हार्बर आणि 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला.
झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचेही आभार मानले. ते म्हणाले, "आतापर्यंतच्या सर्व मदतीबद्दल मी अमेरिकेचे आभार मानतो. अमेरिकेने रशियासाठी आपली सर्व बंदरे बंद करावीत. रशियाशी युद्ध सुरू असताना युक्रेन कधीही शरण येणार नाही. आपल्या देशाचे भवितव्य दुसऱ्या देशांकडून ठरवले जात आहे. हा केवळ आपल्यावर आणि आपल्या शहरांवरचा हल्ला नाही तर आपल्या जगण्याच्या हक्कावरचा हल्ला आहे. अमेरिकेतील लोकांची स्वप्ने स्वातंत्र्याशी संबंधित आहेत, तशीच स्वप्ने युक्रेनच्या लोकांचीही आहेत."
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा रशियाला आदेश
नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) युक्रेनने रशियाविरुद्धचा खटला जिंकला आहे. ICJ ने रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ICJ ने दिलेला हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. आयसीजेच्या आदेशानंतर युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, "रशियाने ताबडतोब आपल्या देशात परत गेले पाहिजे. ICJ च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास रशिया आणखी एकटे पडेल."
रशियाला कडवी झुंज दिल्याबद्दल ICJ ने युक्रेनचे कौतुक केले आहे. युक्रेनची जनता, सैनिक आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणाविरुद्ध दिलेला लढा कौतुकास पात्र आहे, असे कौतुक करत रशिया समर्थक देशांनी रशियाला लष्करी मदत देऊ नये, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.