World Happiness Report : जगातील सर्वात आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या वार्षिक आनंद निर्देशांकात फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडण्यात आले आहे. तर अफगाणिस्तान सर्वात दु:खी देश आहे. डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे देश पहिल्या पाचमध्ये सर्वात आनंदी देश आहेत. तर अमेरिका 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 139 वा होता. 


शुक्रवारी जाहीर झालेल्या या यादीत सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानिया या देशांत चांगले जीवन जगण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ल्ड हॅपीनेस टेबलमध्ये सर्वात मोठी घसरण लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानच्या क्रमांकामध्ये झाली आहे.


सध्या आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या लेबनॉन या देशाचा क्रमांक 144 वा क्रमांक आहे. तर झिम्बाब्वे 143 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान यादीत सर्वात खालच्या नंबरवर आहे.  


कशी तयार केली जाते आनंदी देशांची यादी? 
गेल्या दहा वर्षांपासून आनंदी देशांची यादी तयार केली जात आहे.  जगातील सर्वात आनंदी देशांची यादी संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जाहीर करण्यात येते. आनंदाचा निर्देशांक मोजण्यासाठी त्या देशातील लोकांचे वैयक्तिक पातळीवरील समाधान, त्या देशातील लोकांचं चांगलं राहणीमान, देशाचा जीडीपी आणि त्या देशातील आयुर्मानाचा विचार केला जातो. या सर्व गोष्टींचे मुल्यमापन करून तो देश किती आनंदी आहे हे ठरवले जाते. जगातील दीडशे देशांचे या सर्व गोष्टींच्या आधारे मुल्यमापन केले जाते आणि त्यामधून देशांना क्रमांत दिले जातात. यंदा 146 देशांचे मुल्यांकन करण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या