China Population : साठ वर्षांत पहिल्यांदाच घटली चीनची लोकसंख्या, चीनचा जन्मदर घसरण्याचं कारण काय?
China Birth Rate : चीनमध्ये 2022 सालात गेल्या साठ वर्षांतली सर्वात कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचं दिसून आले आहे.
China Population : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला (China) आपली लोकसंख्या वाढवायची आहे. कारण चीन सध्या म्हाताऱ्यांचा देश बनू लागला आहे. गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच चीनचा जन्मदर नीचांकी पातळीवर आला आहे. साठ वर्षांत पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या घटली आहे. चीनमध्ये 2022 साली 95 लाख मुलांचा जन्म झाला आहे. तर 2011 साली 1 कोटी 62 लाख मुलांचा जन्म झाला होता.
आपल्या संपन्नतेचा आणि प्रगतीचा अभिमान बाळगणारा चीन कोरोनानंतर आणखी एका संकटात सापडला आहे. कोरोनाचा प्रकोप सर्वोच्च पातळीवर असताना चीनी ड्रॅगनला आणखी एक झटका बसला आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने लोकसंख्येबाबत धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे. या रिपोर्टनुसार चीनचा जन्मदर कमालीचा घसरला आहे.
चीनचा जन्मदर घसरला (China Birth Rate)
2021 मध्ये 7.52 टक्के असलेला जन्मदर 2022 मध्ये 6.67 टक्क्यांवर आला आहे. 1961 सालानंतर चीनचा जन्मदर इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण्याची पहिलीच वेळ आहे. 2021 मध्ये चीनमध्ये एक हजार नागरिकांमागे 752 मुलांचा जन्म तर 2022 मध्ये ही संख्या 667 पर्यंत खाली आली आहे.
चीनमध्ये 2022 सालात गेल्या साठ वर्षांतली सर्वात कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचं दिसून आलं आणि या घसरत्या जन्मदरामुळे चीन सध्या म्हाताऱ्यांचा देश बनला आहे. चीनमध्ये 2022 मध्ये 95 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2021 साली ही संख्या एक कोटी 62 लाख इतकी होती. 2022 साली चीनची लोकसंख्या 8 लाख 50 हजारांनी घटली आहे. 2021 साली चीनची लोकसंख्या 141 कोटी 26 लाख होती. तर 2022 साली लोकसंख्या कमी होऊन 141 कोटी 18 लाखांवर आली.
लोकसंख्या वाढीसाठी इन्सेटिव्हपासून गृहनिर्माण प्रकल्प आणि शिक्षणात मोठी सूट
चीनच्या लोकसंख्येत देशातल्या 31 राज्यातल्या नागरिकांची शीरगणती केली जाते. या राज्यांमध्ये हाँगकाँग, तैवान आणि मकाऊचा समावेश नाही. चीनची लोकसंख्या 2016 सालापासून कमी होऊ लागली आहे. यानंतर लोकसंख्या वाढीसाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले गेले. लोकसंख्या वाढवण्यासाठी पैशांच्या स्वरुपातल्या इन्सेटिव्हपासून गृहनिर्माण प्रकल्प आणि शिक्षणातही मोठी सूट देऊ केली.
2021 च्या सुरुवातीला चीनने देशातली वन चाईल्ड पॉलिसीही शिथील करुन दाम्पत्याला तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे. पण या सगळ्या उपाययोजनांचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. त्यामुळे एकेकाळी आपल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी झगडणारा चीनी ड्रॅगन आता लोकसंख्या वाढवण्यासाठी हरएक प्रयत्न करत आहे.