India-Canada : भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले! आता म्हणतायत, भारतासोबत संबंध महत्वाचे
Canada PM Justin Trudeau : कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देताना ट्रूडो यांनी म्हटलं की, कॅनडा भारताशी 'जवळचे संबंध' निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
India-Canada Relation : खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरदीप सिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येनंतर भारत (India) आणि कॅनडामध्ये (Canada) तणाव निर्माण झाला आहे. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्याने भारताने जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी कॅनडाला फटकारलं. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान काहीसे नरमल्याचं पाहायला मिळत आहेत. भारतासोबतचे चांगले संबंध गरजेचे आहेत, असं टुड्रो यांनी म्हटलं आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देताना ट्रूडो यांनी म्हटलं की, कॅनडा भारताशी 'जवळचे संबंध' निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारताशी 'घनिष्ठ संबंध' निर्माण करण्यासाठी प्रयत्न
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, ''जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये शीख नेते हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा 'विश्वासार्ह आरोप' असूनही, कॅनडा अजूनही भारताशी 'घनिष्ठ संबंध' निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे." मॉन्ट्रियल येथे पत्रकार परिषदेत ट्रुडो यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताचं वाढतं महत्त्व लक्षात घेता कॅनडा आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी 'रचनात्मक आणि गांभीर्याने' सहभाग घेणं 'अत्यंत महत्त्वाचं' आहे."
भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी केला. भारताने हे आरोप फेटाळून लावले. राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाला खतपाणी घालणं, चुकीचं असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना फटकारलं. यूएन महासभेत जयशंकर यांनी कॅनडाला खडेबोल सुनावले.
कॅनडाचे पंतप्रधान काय म्हणाले?
जस्टिन टुड्रो यांनी भारताबाबत वक्तव्य करताना म्हटलं की, भारत एक वाढती आर्थिक शक्ती असून भौगोलिक शक्तीही आहे. आम्ही भारतासोबत घनिष्ठ संबंध बनवण्यासाठी प्रयत्नशील असून गंभीर आहोत. भारताला हे सुनिश्चित करण्याची गरज आहे की, कॅनडासोबत मिळून या प्रकरणाची सत्यता आणि तथ्य समोर आणणं गरजेचं आहे.
भारत आणि कॅनडातील वादाचं नेमकं कारण काय?
कॅनडामध्ये 18 जून रोजी दोन अज्ञात हल्लेखोरांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर ही घटना घडली. याप्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले. हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमागे भारत असल्याचा गंभीर आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला. भारतानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि कॅनडाकडे या आरोपांसंबंधातील पुरावे मागितले आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :