देश सोडून परागंदा झाल्या, मोदींमुळे संकटकाळी दिल्लीत आश्रय, पण आता शेख हसीना कुठे जाणार?, मुलाने सांगितली A टू Z स्टोरी
Bangladesh Protest: शेख हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही माहिती चुकीची आहे, असं शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी स्पष्ट केले.
Bangladesh Protest Dhaka Sheikh Hasina: राखीव जागांच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमधील हिंसक निदर्शनांची (Bangladesh Protests) धग इतकी वाढली की सोमवारी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पदाचा राजीनामा देऊन तातडीने देश सोडावा लागला. यानंतर भारताकडे पलायन करण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली. शेख हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही माहिती चुकीची आहे, असं शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी स्पष्ट केले.
आजतकला दिलेल्या मुलाखतीत सजीब वाजेद म्हणाले की, माझ्या आईने बांगलादेशात सर्वोत्तम सरकार चालवले. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही. दहशतवादाशी त्यांनी ताकदीने आणि धैर्याने मुकाबला केला. पण आता त्या 77 वर्षांच्या झाल्या आहेत. बांगलादेशसाठी त्यांना जे काही करायचे होते ते त्यांनी केले आहे. सध्याची बांगलादेशमधील परिस्थिती पाहून आई शेख हसीना खूप निराश आहेत, असं साजिब वाजेद यांनी सांगितले. तसेच आता शेख हसीना या आपल्या नातवंडांसोबत जगातील विविध देशांमध्ये वेळ घालवणार असल्याचंही साजिब वाजेद यांनी सांगितले.
शेख हसीना यांनी लंडनकडे आश्रय मागितला?
शेख हसीना यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याच्या प्रश्नावर सजीब वाजेद म्हणाले, लंडनमधून येणारे वृत्त चुकीचे आहे. त्यांनी अद्याप कोणाकडेही आश्रय मागितलेला नाही. आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आहोत. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांबद्दल बोलताना साजिब वाजेद म्हणाले की, आता तिथे अल्पसंख्याकांच्या मंदिरांवर हल्ले होत आहेत.
'जमात-ए-इस्लामीची संपूर्ण भूमिका'
सजीब वाजेद पुढे म्हणाले, बांगलादेशमधील निदर्शने थांबवण्यासाठी बळाचा वापर आवश्यक होता. पण माझ्या आईने ठरवले होते की, विद्यार्थ्यांविरुद्ध सुरक्षा दलाचा वापर करणार नाही. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी राजीनामा देणेच योग्य मानले. या संपूर्ण घटनेत जमात-ए-इस्लामीची भूमिका आहे. ते लोक अतिरेकी आहेत. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. 1975 मध्येही आमच्या पक्षाच्या नेत्यांची हत्या झाली. अशीच परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या नेत्यांचे नक्कीच रक्षण करू. पण बांगलादेशचे भविष्य ही आता आपली जबाबदारी नाही, असं साजीब वाजेद यांनी सांगितले.
बांगलादेशचे भवितव्य काय असेल?
बांगलादेशचे भविष्य काय असू शकते? या मुद्द्यावर बोलताना साजिब म्हणाले, आम्ही अनेक विनंती करुन शेख हसीना यांना बांगलादेश सोडण्यास तयार केले. बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान बनेल. हे त्याचे भाग्य आहे. आम्ही लष्करावर अजिबात टीका करणार नाही. चीनने कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यांचा यात काहीही सहभाग नाही. चीनसोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.