(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Iran Protest : हिजाबविरोधात इराणमध्ये रणकंदन सुरुच; आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू, 60 महिलांसह 700 जण अटकेत
Iran Protest : नैतिकता पोलिस कोठडीत झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू असलेल्या रणकंदनामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 60 महिलांसह 700 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
Iran Protest : नैतिकता पोलिस कोठडीत झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू असलेल्या रणकंदनामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 60 महिलांसह 700 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. 22-वर्षीय कुर्दिश महिला महसा अमिनीचा इराणमध्ये कुप्रसिद्ध नैतिकता पोलिसांनी योग्य प्रकारे हिजाब न घातल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तिचा कोठडीमध्ये मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर, देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत असून सरकारने आंदोलकांवर अटकेची कारवाई केली आहे.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या राजवटीने व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम यांसारख्या कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरही बंधने घातली आहेत.
सरकारकडून अटकेची कारवाई
या कारवाईत शेकडो अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने मृतांची संख्या ४१ वर दिली आहे. इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, निदर्शकांनी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेला आग लावली आहे.
इराण ह्युमन राइट्स नावाच्या ओस्लो-आधारित अधिकार गटाचा दावा आहे की सुरक्षा कर्मचारी वगळून मृत्यूचा आकडा 54 वर पोहोचला आहे. अधिकार गटांचा असाही दावा आहे की बहुतेक मृत्यू मझादरन आणि गिलान प्रांतात झाले आहेत.
महिलांचा कायद्याविरोधात एल्गार, केळ कापले, हिजाब जाळला
सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तेहरान तसेच देशातील इतर शहरांमधील आंदोलक सरकारच्या कठोर कायद्यांबद्दल निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये अशा महिला आहेत ज्या देशाच्या कायद्याच्या विरोधात आहेत. ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना हेडस्कार्फ घालणे बंधनकारक आहे. महिला आपले केस कापून, हिजाब जाळतानाही दिसून येत आहेत.
आंदोलनाचे युरोपमध्ये पडसाद
इराणमधील निदर्शने इतर राष्ट्रांमध्येही पसरली आहेत. शेकडो इराणींनी अनेक युरोपियन शहरांमध्ये निदर्शकांवर सरकारची कारवाई आणि हेडस्कार्फवरील कठोर कायद्यांचा निषेध करण्यासाठी रॅली काढली. दरम्यान, या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ड्रेस कोडच्या रक्षणार्थ सरकार समर्थित रॅलीचा भाग म्हणून हजारो लोक शुक्रवारी रस्त्यावर उतरले.