(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sukha Duneke: कॅनडात भारतातील फरार गँगस्टर सुक्खाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरण नेमकं काय?
भारतातून पलायन करून कॅनडामध्ये लपलेल्या आणखी एका गँगस्टरची कॅनडात हत्या करण्यात आली आहे. एका श्रेणीतील गुंड सुखदुल सिंह उर्फ सुखा दुनुके हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ अर्श दलाचा राईट हँड होता.
Sukha Duneke: भारतातून (India) पळून गेलेल्या आणखी एका गँगस्टरची कॅनडातील (Canada) पिनिपेग शहरात हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधून (Punjab) पलायन करून कॅनडामध्ये बसलेला A कॅटेगरीचा गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनुके (Sukha Duneke Canada Murder) याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) उर्फ अर्श दलाचा राईट हँड होता. एनआयएच्या वॉन्टेड यादीतही त्याचा समावेश होता. सुक्खा कॅनडामध्ये बसून भारतातील आपल्या गँगच्या गुडांमार्फत अपहरण आणि खंडणी उकळण्याचं काम करायचा.
सुखदुल सिंह उर्फ सुक्खा दुनेके यानं 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून कॅनडाला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांशी संगनमत करून त्याने कॅनडाचा व्हिसा मिळवला होता, याप्रकरणीही दुनेके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर त्याला मदत केल्याचा आरोप होता, त्यांनंतर त्या पोलिसांना मोगा पोलिसांनी अटक केली होती.
यावर्षी मार्चमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या. त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शनं केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या आणि निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले होते.
खलिस्तानसाठी सार्वमत घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटात हरदीपसिंह निज्जरचं नाव मोठं होतं. तो पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील भरसिंहपूर गावचा रहिवासी होता. हरदीपसिंह निज्जरला भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी फरारी आणि दहशतवादी घोषित केलं होतं. याशिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणेनं निज्जरवर 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर काय आरोप केले?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत (हाऊस ऑफ कॉमन्स) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की, "कॅनडाच्या सुरक्षा संस्था भारत सरकार आणि कॅनडाच्या नागरिकांची चौकशी करत आहेत. हरदीपसिंह निज्जर यांचा हत्येतील सहभागाबद्दल आम्ही मधल्या संबंधांच्या आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहोत. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये इतर कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या कायद्याचं उल्लंघन आहे आणि ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे."