(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Politics Crisis: संसद बरखास्त केल्यानंतर विरोधकांनी भरवलं 'आपलं अधिवेशन', इम्रान खानविरोधात अविश्वास प्रस्तावही मंजूर
Pakistan News: पाकिस्तानमधील नाट्यमय घडामोडीत राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केल्यानंतर विरोधकांनी आज आपलं संसदीय अधिवेशन भरवलं.
Pakistan News: पाकिस्तानमधील नाट्यमय घडामोडीत राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केल्यानंतर विरोधकांनी आज आपलं संसदीय अधिवेशन भरवलं. या अधिवेशनात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव जवळपास 200 मतांनी मंजूर करण्यात आला. सोमवारी 'डॉन' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) नेते आणि नॅशनल असेंब्लीचे (एनए) माजी अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी रविवारी एनएशी बोलताना मतदानाचा निकाल जाहीर केला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असद कैसर हे अध्यक्षांच्या पॅनेलचे सदस्य होते.
वृत्तानुसार, विरोधी पक्षाने ही कार्यवाही कायदेशीर असल्याचे घोषित केली आहे. असं असलं तरी ही कार्यवाही सचिवालयाच्या कर्मचार्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि आवाज उपकरणांशिवाय चालविली गेली. विरोधी पक्षांनी पंतप्रधान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव 197 मतांनी यशस्वी झाल्याचे घोषित केले.
इम्रान यांच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी बरखास्त केली संसद
पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीवरून नॅशनल असेंब्ली बरखास्त केली आहे. याच्या काही वेळापूर्वीच नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांनी पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये खान यांनी बहुमत गमावले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घेतली माहिती
पाकिस्तानचे सरन्यायाधीश ओमर अता बंदियाल यांनी पाकिस्तानातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची स्वतःहून दखल घेतली आहे. नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी सुरू केलेले सर्व आदेश आणि पावले न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील, असे ते म्हटले होते. या 'हाय प्रोफाईल' खटल्याची सुनावणीही न्यायाधीश बंदियाल यांनी एक दिवसासाठी तहकूब केली आहे. दरम्यान, नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना कोणतेही असंवैधानिक पाऊल न उचलण्याचे आदेश देताना सोमवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.