Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर पुढील 24 ते 36 तासांत आणखी एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता : जो बायडन
Afghanistan Crisis : काबुल विमातळावर पुढील 24 ते 36 तासांत आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दिली आहे.
Afghanistan Crisis : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी काबुल विमानतळावर आणखी एक दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. बायडन म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अद्यापही अत्यंत भयावह आहे. पुढच्या 24 ते 36 तासांत काबुल विमानतळाला दहशतवादी पुन्हा एकदा निशाणा करु शकतात. काबुलमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या दहशतवादी संघटना आयएसआयएसवर अमेरिकेनं केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जो बायडन यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. दरम्यान, अमेरिकेनं ड्रोनच्या मदतीनं अफगाणिस्तानातील आयएसआयएसच्या तळांवर बॉम्बचा वर्षाव केला आणि दहशतवाद्यांची अनेक तळं उद्ध्वस्त केली.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमधून शनिवारी जारी केलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, "अफगाणिस्तान खासकरुन काबुलमधील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. काबुल विमानतळावर आणखी एक आत्मघातकी हल्ला होण्याची शक्यता आहे. आमचं सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 ते 36 तासांत तिथए आणखी एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो."
निष्पाप लोकांना लक्ष्य करणाऱ्यांना सोडणार नाही : जो बायडन
जो बायडन म्हणाले की, त्यांनी शनिवारी आपल्या नॅशनल सिक्युरिटी टीम आणि अफगाणिस्तानात उपस्थित सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बातचित केली. अमेरिकन एअरफोर्सनं अफगाणिस्तानात काबुल एअरपोर्टवर करण्यात आलेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या ISIS-K च्या तळांवर ड्रोनच्या मदतीनं बॉम्ब वर्षाव केला होता. त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असल्याची माहिती बायडन यांनी दिली. बायडन म्हणाले की, "मी सांगितलं होतं की, काबुलमध्ये निष्पाप लोकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही आणि आम्ही तसं करुन दाखवलं."
ISIS वरील आमचा हा शेवटचा एअर स्टाईक नाही : जो बायडन
जो बायडन म्हणाले की, दहशतवादी संघटनेवर आमचा हा शेवटचा एअर स्ट्राईक नाही. काबुलच्या स्फोटासाठी जे कोणी जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यापैकी प्रत्येकाला शोधून काढू आणि त्यांना आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. जेव्हा कोणी अमेरिकेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. याबद्दल कोणालाही शंका नसावी. "
अमेरिकेचे जबर प्रत्युत्तर, ISIS च्या तळांवर बॉम्बचा वर्षाव; 'काबुल' मास्टरमाईंडच्या मृत्यूची शक्यता
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश होता. आयसिसने केलेल्या या हल्ल्याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. अफगाणिस्तानमधील आयसीसच्या तळांवर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बचा वर्षाव केला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यात काबुल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्लाला जशास तसं उत्तर देणार आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलं होतं. काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेवर मोठा दबाव होता.