Washim News: वाशिम शहरात खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिकांना रस्त्यावरुन चालतानाही मनस्ताप
Washim News : वाशिम शहरात अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाशिमकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र सध्या आहे.
Washim News : वाशिममध्ये (Washim) सध्या खड्ड्याचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अनेक देश चंद्रावर किंवा मंगळ ग्रहावर जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. तिथे हवा पाणी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे फोटोही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिथली स्थिती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. असाच काहीसा अनुभव सध्या वाशिमकरांना येत आहे.
नगरपालिकेने भूमिगत गटार योजना गेल्या अकरा वर्षांपूर्वी सुरु केली होती. मात्र ही योजना पूर्ण होत होता दहा वर्षे लागली. त्याचप्रमाणे त्यासाठी खोदलेले रस्ते भरण्यासाठी देखील तितकाच वेळ लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळा आला की वाशिम शहराची स्थिती ही चंद्रासारखी किंवा मंगळ ग्रहासारखी होते.
वाशिम नगरपालिका तशी छोटी नगरपालिका म्हणून ओळखली जाते. या नगरपालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशासकीय नियुक्ती जरी या दोन वर्षात केलेली असली तरी मात्र गेल्या दहा वर्षात भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आणि त्यांची सत्ता नगरपालिकेवर होती. पण विकासाच्या बाता करणाऱ्या नेत्यांचं पितळ वाशिमसारख्या छोट्या शहरातील परिस्थितीमुळे उघडं पडल्याचं म्हटलं जात आहे. जिल्ह्यात अनेक भागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. पण निकृष्ट कामामुळे जे रस्ते किमान दहा वर्षे टिकायला हवे तेच रस्ते दोन वर्षातच खचत चालल्याचं पाहायला मिळत आहे.
नागरिकांना नाहक त्रास
वाशिममधील काळे फाईल भाग असो मंत्री पार्क, आयडीपी कॉलनी किंवा जुन्या शहरातील देव पेठ भागातील अनेक रस्ते हे चंद्र आणि मंगळ ग्रहासारखे दिसायला लागले आहेत. उन्हाळा आला की या रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य असतं. त्यामुळे नागरिकांना अनेक आजार होत असल्याचं म्हटलं जात. तर पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य असतं. त्यामुळे या रस्त्यांवरुन जाताना होळीसारखा अनुभव मिळत आहे. कोणतेही वाहन आलं की अंगावर चिखल आणि घाण उडते. नागरिकांना या गोष्टीमुळे रस्त्यावरुन चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाशिम नगरपालिकेच्या मतदारसंघात भाजपचे आमदार लखन मलीक गेल्या तीन टर्मपासून इथे आमदार आहेत. तर शिंदे फडणवीस सरकारमधील खासदार भावना गवळी गेल्या पाच टर्मपासून या भागाचे नेतृत्व करत आहेत. पण तरीही विकासाच्या बाबतीत या भागाचा नंबर शेवटी लागत असल्याचं चित्र सध्या आहे. शहरात दर दोन-तीन वर्षांनी एक रस्ता होतो. हा रस्ता पूर्ण होताच मागील रस्ता खचण्यास सुरुवात होते. त्यामुळे खड्ड्यांशिवाय सध्या एकही रस्ता वाशिम जिल्ह्यात नाही. अनेक नवी कोरी वाहने दोन ते तीन वर्षातच खिळखिळी होतात. त्यामुळे वाशिमकरांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे.
हेही वाचा :