वाशिमच्या जैन मंदिराचा वाद चिघळणार, 42 वर्षानंतर उघडलेले मंदिराचे दरवाजे
Washim : सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचे दार उघडण्याचे आदेश दिले, मात्र दार उघडे होताच पुन्हा तोच जुना वाद मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Washim Latest News Update : वाशिम जिल्ह्यातील जैन धर्मियांची काशी असलेल्या शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर जैन धर्मियांच्या दोन पंथीयांमध्ये देव कुणाचा या मुद्यावरून गेल्या 42 वर्ष मंदिराचे दार बंद झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचे दार उघडण्याचे आदेश दिले, मात्र दार उघडे होताच पुन्हा तोच जुना वाद पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे शिरपूर जैन मंदिर परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे मंदिराचे उघडे दारे पुन्हा बंद होते की काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरामध्ये गेल्या 5 दिवसांपासून आनंदाचं वातावरण होतं. त्याच कारण म्हणजे गावातील जैन धर्मियांचं पवित्र स्थान असलेल्या भगवान पार्श्वनाथचे मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उघडले जाणार होते. गेल्या 42 वर्षांपासून हे मंदिर बंद होते. न्यायालयाच्या आदेशानंतर श्वेतांबर पंथीयाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मंदिराचे दार उघडले. त्यानंतर लेप प्रक्रिया सुरु केली जाणार होती. पण त्याआधीच दिगंबर पंथीयांनी आक्षेप घेत दाराचे टाळे उघडून प्रवेश घेत दर्शन घेतले. मंदिराचे टाळे तोडून दर्शन घेण्याच्या कृतीवरून श्वेतांबर पंथीयांनी आक्रमक होऊन आंदोलन करत उपोषण सुरु केले. स्थानिक पोलीस स्टेशनसमोरही त्यांनी निदर्शने केली.
गेले अनेक दशक मंदिराच्या मुर्ती हक्कावरून वाद झाला आणि परिणामी 42 वर्ष वाया गेले. चुकीच्या पद्धतीने पुन्हा टाळे लावणे योग्य नसून सर्वोच्च न्यायालयाने मंदिर उघडल्याने गावाचा आणि परिसराचा विकास होईल. दोन्ही पंथाने सामोपचाराने मार्ग काढावा आणि जर मार्ग काढता येत नसेल तर प्रशासनाने ताब्यात घेऊन मंदिर दर्शनासाठी नेहमी उघडे करावे, अशी मागणी गावातील नागरीक करत आहे.
लेप लावण्याच्या कारणावरून पुन्हा दोन महिने मंदिराचे दार बंद करणे चुकीचे आहे. टाळे माणसाला लागतात देवाला नाही. मंदिर, मस्जिद, गुरुद्वाराला कुलूप लावणे चुकीचे आहे. शांततेच्या मार्गाने तोडगा काढा. मंदिर उघडे ठेवून लेप प्रक्रिया पार पाडावी. मंदिराचे दार उघडे ठेवावे, अशी मागणी महंत शिधांतसागर महाराज यांनी केली. 1910 पासून दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयामध्ये देव कुणाचा म्हणून वाद सुरु आहे. 57 वर्ष प्रीव्ही कॅउन्सीलच्या न्यायलयात हा वाद सुरु होता. लेप करण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला. 1960 मध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आणि तो 1982 पर्यंत चालला. तेंव्हा मंदिराला पुन्हा टाळे लागले. ते आता उघडण्यात आले.
जगाला शांती आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथ यांचे अनुयायी मूर्ती आणि देव कुणाचा या मुद्यावरून 113 वर्षांपासून हक्काची लढाई लढत आहे. त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर मंदिराचे दार उघडले आणि पुन्हा तोच वाद घडू लागला. त्यामुळे जुन्या वादाप्रमाणे पुन्हा मंदिराला टाळे लागू नये, अशी प्रार्थना गावातील नागरिकांसह समाजातील लोकांना वाटते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
