Wardha Rain : वर्ध्यात पावसाचे थैमान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या कर्मचाऱ्याची तब्बल 24 तासांनी सुटका
Wardha Rain Update : राहुल मुन हे कर्मचारी गुरुवारी सकाळ पासून पुराच्या पाण्यात अडकले होते. शुक्रवारी दुपारी मदत पथकाने अथक प्रयत्न करून त्यांची सुखरुप सुटका केली.
Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील गव्हा येथे पुरात अडकलेल्या कर्मचाऱ्याची 24 तासानंतर सुटका करण्यात आली आहे. राहूल मुन असे सुटका करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते समुद्रपूर तालुक्यातील पिव्ही टेक्सटाईल्सच्या पाणी पुरवठा विभागात काम करतात.
राहुल हे गुरुवारी सकाळ पासून पुराच्या पाण्यात अडकले होते. शुक्रवारी दुपारी मदत पथकाने अथक प्रयत्न करून त्यांची सुखरुप सुटका केली. आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे मार्ग ठप्प झाले आहेत. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
पिव्ही टेक्सटाइलला पाणी पुरवठा करणारे ठिकाण हे गव्हा या गावा जवळील नदीच्या पात्रा जवळ आहे. गुरुवारी दुपारी राहूल मुन हे कामावर गेले होते. रात्री अचानक पाणी पुरवठा विभागाला पुराच्या पाण्याने चारही बाजुंनी वेढा घातला. त्यामुळे राहुल यांना तेथून बाहेर निघणे कठीण झाले. तब्बल 24 तास त्यांनी मदतीची वाट पाहिली. पाणी पुरवठा विभागाचा तळमजला पाण्यात गेल्याने ते पहिल्या माळ्यावर चढले. गुरूवारची संपूर्ण रात्र राहुल तेथेच बसून होते.
शुक्रवारी सकाळी राहुल यांनी पिव्हीच्या अधिकारी आणि गव्हा गावातील नितिन पुनासे यांना फोन करून आपण पुरात अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर हिंगणघाटच्या प्रशासनाने त्वरीत दखल घेत मदत पथक घटनास्थळी रवाना केले. राहुल रात्रभर जीव मुठीत धरुन बसलेला होता. अखेर 24 तासांनी त्याची सुटका करण्यात आली.
राहुल ज्या भागात अडकले होते तो भाग जंगली भाग आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मदत पथकाला देखील अनेक अडचणींचा समाना करावा लागला. शुक्रवारी सकाळी हिंगणघाट येथून निघालेल्या मदत पथकाने दुपारी दोन वाजता राहूल यांची सुटका केली.
महत्वाच्या बातम्या