Wardha : सासरवाडीची संपत्ती हडपण्याच्या उद्देशाने दारूत विष देऊन साडूचा खून; वर्ध्यातील धक्कादायक घटना
सेलू तालुक्यातील जुनगड या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वर्धा: सासरवाडीची संपत्ती हडपण्याच्या कारणातून सख्या साडूने दारूत विष देऊन साडूची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील जुनगड येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोरेश्वर मारोतराव पिंपळे (रा. जुनगड मठ वय 33) असे मृतकाचे नाव आहे. तर संदीप तामदेव पिंपळे (वय 42) असं मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पिंपळे याने आपल्या साडूशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी थंड डोक्याने कट रचला. त्यानुसार आरोपीने सिनेमातील क्राईम कथानकाला लाजवेल असा खूनाचा कट रचला. याप्रकरणी संदीप पिंपळे या मुख्य आरोपीसह पोलिसांनी जडिबुटी विकणाऱ्या विजयसिंह चितोडीया (वय 41) आणि राजकुमार चितोडीया (वय 22) आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी मृतकाच्या घरी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मृतकाचा साडभाऊ संदीप याने कान्होलिबारा येथून दारू आणली होती. त्याने मृतकास फोन करून घराबाहेर बोलावले आणि त्यास दारू दिली. रात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर 11 वाजण्याच्या दरम्यान ती दारू पिताच काही मिनिटातच मोरेश्वर जमिनीवर कोसळला. हा प्रकार लक्षात येताच आरोपीसह नातेवाईकांनी त्यास सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा सेलू पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान मृतकाच्या पत्नीने आणि नातेवाईकांनी या बाबत तक्रार दाखल करून संशय व्यक्त केला. त्यानुसार सेलू पोलिसांनी मृतकाच्या साडूला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि त्याला खाकीचा हिसका दाखवताच आरोपीने हत्येची कबुली दिली.
जडी बुटी विकणाऱ्या दोघांनाही अटक
आरोपीने सासऱ्याची संपत्ती हडपण्यासाठी जाणीवपूर्वक विष देऊन हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटना स्थळावरून दारूची आणि विषाची बाटली जप्त केली. मुख्य आरोपीला अटक केल्यावर त्याने विष हे जडीबुटी विकणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी विजयसिंह चितोडीया आणि राजकुमार चितोडीया या दोघांना अटक केली आहे. हे दोघे जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करतात. या प्रकरणी पोलिसांनी विष पुरवठा करणाऱ्या जडीबुटी विकणाऱ्या दोन आरोपींना अमरावती येथून रात्री अटक केली. आज आरोपींना सेलू न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे आणि नितीन नलावडे करीत आहे.