Wardha : वर्ध्यात भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
Wardha Accident : वर्धा-नागपूर महामार्गावरील केळझरजवळ हा अपघात घडला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वर्धा : वर्ध्यात आज एक मोठा अपघात घडला असून ट्रकला मागून येणाऱ्या एका भरधाव कारने जबर धडक दिली. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केळझर जवळ वर्धा-नागपूर महामार्गावरील उड्डाण पुलावर घडला. गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गजानन सरदार (वय 52) आदेश्वर खुनकर (वय 35) दोघेही रा. यवतमाळ असे मृतकांची नावं आहेत. तर सुनील श्रावण थोटे (वय 49) रा. यवतमाळ आणि अतुल देविदास गोडे (वय 36) रा. वर्धा अशी जखमींची नावं आहेत.
चारचाकीच्या दर्शनीय भागाचा चुराडा
अपघातात कारचा दर्शनीय भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघात घडल्यावर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. नागपूरकडून एम एच 40 बी एल 1942 क्रमांकाचा ट्रक कटणीवरून नागपूर मार्गे कर्नाटकला मैदा भरून जात होता. याचवेळी ट्रकच्या मागून एम एच 29 बीव्ही 9597 क्रमांकाची कार नागपूर वरून यवतमाळला भरधाव वेगाने जात होती. दरम्यान कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन ट्रकला मागून जोरदार धडकली. यात कारमधील दोघांना जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झालेत.
जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले
अपघातात सुदैवाने दोघांचा जीव वाचला असून त्या जखमींना तात्काळ रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी फसलेल्या एका मृतकाला बाहेर काढतांना कारला चक्क कटरने कापावे लागले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनस्थळ गाठले. नागरिकांनी मदतकार्य केले. याची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे, गजानन वाठ, अखिलेश गव्हाणे, अनिल भोवरे, सचिन वाटखेडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.