राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा
Nagpur News: सोलापूरकर यांनी बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असा सज्जड इशारा ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

नागपूर: अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अशातच राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबतचा एक व्हीडिओ समोर आला आहे. परिणामी राज्यभरातून सोलापूरकरांविरोधात संतापाची लाट अधिक तीव्र होत असतानाच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदांना मानणारे आणि ब्राम्हण होते, असे विधान केले. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सोलापूरकर यांनी बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असा सज्जड इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम (Dharmpal Meshram)यांनी दिला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी पुरावा देत तात्काळ खुलासा करावा- ऍड. धर्मपाल मेश्राम
राहुल सोलापूरकर यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण असल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे वृत्त वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित आणि प्रसारित झाले. तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झाल्या. त्याबाबत सोलापूरकर यांना आयोगाने नोटीस बजावून विचारणा केलेली आहे की, त्यांनी दिलेले संदर्भ त्यांनी दिलेल्या संदर्भांच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावे, लिखान असल्यास ते आयोगाच्या पुढे करावे. सोलापूरक यांनी तसे वक्तव्य करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे आणि या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात तात्काळ खुलासा करावा, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केल्या आहेत.
राहुल सोलापूरकर यांनी आता इतिहासावर बोलूच नये- मंत्री उदय सामंत
राहुल सोलापूरकर यांनी आता इतिहासावर बोलणे थांबवावे. किंबहुना राहुल सोलापूरकर यांनी आता इतिहासावर बोलूच नये, असा सल्ला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राहुल सोलापूरकरांना दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे, असे ही उदय सामंत म्हणालेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

