Egypt : 4500 वर्ष जुन्या गीझा पिरॅमिडचं नवं रहस्य उलगडलं, नऊ मीटर लांबीच्या कॉरिडॉरचे फोटो समोर
Corridor in Pyramid of Giza : गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये छुपा नऊ मीटर लांबीचा कॉरिडॉर सापडला आहे. यामुळे शास्त्रज्ञ चकित झाले आहेत. 4500 वर्षे जुन्या पिरॅमिड डीप स्कॅनिंग सुरू करण्यात आली आहे.
Secrets of Pyramids of Giza : जगातील सात आश्चर्यांपैकी एक इजिप्तमधील (Egypt) गीझा पिरॅमिडबाबत (Giza Pyramid) अद्यापही अनेक रहस्य लपलेली आहेत. आता शास्त्रज्ञांच्या संशोधनात मोठं नवं रहस्य समोर आलं आहे. यामुळे गीझा पिरॅमिड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये छुपा कॉरिडॉर (Corridor) सापडला आहे. यामुळे शास्त्रज्ञ चकित झाले आहेत. नऊ मीटर लांबीचा कॉरिडॉर सापडला आहे. 4500 वर्षे जुन्या गीझाच्या भव्य पिरॅमिड (The Great Pyramid of Giza) डीप स्कॅनिंग (Deep Scanning) सुरू आहे.
गीझा पिरॅमिडचं नवं रहस्य उलगडलं
गीझाचं भव्य पिरॅमिड (The Great Pyramid of Giza) जगातील सात आश्चर्यांमधील एक आहे. हे पिरॅमिड 4500 वर्षांपूर्वी इजिप्तच्या राजांने तयार केलं होतं. हे पिरॅमिड मूळात एक कबर आहे. इजिप्तच्या चौथ्या घराण्याची ही कबर आहे. या पिरॅमिडबाबत अद्याप अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. शास्त्रज्ञांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. आता पुरातत्व शास्त्रज्ञांना छुपा कॉरिडॉर सापडला आहे.
नऊ मीटर लांबीच्या कॉरिडॉरचे फोटो समोर
इजिप्तमधील गिझाच्या ग्रेट पिरॅमिडमध्ये लांब कॉरिडॉर सापडला आहे. पिरॅमिडच्या उत्तरेकडील बाजूच्या संशोधनात हा कॉरिडॉर सापडला आहे. हा कॉरिडॉर नऊ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आहे. हा कॉरिडॉर पिरॅमिडच्या मुख्य गेटच्या वरच्या भागात सापडला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जाही हवास आणि पर्यटन मंत्री अहमद इसा यांनी या कॉरिडॉरबाबत माहिती दिली आहे.
येत्या काळात आणखी रहस्य उलगडतील
इजिप्तमधील पुरातत्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पिरॅमिडमध्ये अनेक रहस्यं येत्या काळात उलगडतील. प्राचीन जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या या गीझाच्या भव्य पिरॅमिडचं रहस्य उलगडण्यासाठी पिरॅमिड स्कॅनिंग प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता. या पिरॅमिडमधील रहस्य जाणून घेण्यासाठी इन्फ्रारेड थर्मोग्राफी, 3D सिम्युलेशन आणि कॉस्मिक-रे इमेजिंग यांसारख्या नॉन-इनवेसिव्ह तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
कॉरिडॉरच्या शोधात काय सापडलं?
नेचर जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका लेखात या कॉरिडॉरबाबत माहिती देण्यात आली आहे. गीझाच्या भव्य पिरॅमिडच्या उत्तरेकडील गेटजवळ नऊ मीटर लांबीचा कॉरिडॉर सापडला आहे. या लेखात म्हटलं आहे की, नव्याने सापडलेला कॉरिडॉर पिरॅमिडचे बांधकाम आणि कॉरिडॉरच्या समोर असलेल्या चुनखडीच्या संरचनेबाबत अधिक माहिती मिळण्यात मदत करू शकतो. गीझाचं भव्य पिरॅमिड 2560 ईसापूर्व राजा फारो खुफू आणि चेप्सच्या कारकिर्दीत कबर म्हणून बांधला गेला. सुरुवातीला हा भव्य पिरॅमिड 146 मीटर (479 फूट) उंच होता, पण आता याचा फक्त 139 मीटर भाग उरला आहे. 1889 मध्ये पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या बांधकामाआधी गीझाचं भव्य पिरॅमिड मानवनिर्मित सर्वात उंच रचना होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :