वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर का करु नये? जाणून घ्या
Mobile Phone Use : वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असं सांगितलं जातं. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर.

मुंबई : मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असून ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला वीज पडून (Lightning) नुकसानीच्या घटना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीज पडून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असं सांगितलं जातं. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही बातमी जरूर वाचा.
पावसाळ्यात जेव्हा विजा कडकतात, तेव्हा अनेक लोक विद्युत उपकरणे बंद करतात. याशिवाय पावसाळ्यात विजा चमकताना खुल्या आकाशाखाली मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली जाते, पण यामागचं नेमकं कारण काय? हे फार कमी लोकांना माहिती आहे. वीज चमकताना मोबाईल फोन न वापरण्यामागचं कारण काय? मोबाईल फोन आणि विजेचा नेमका संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
या कारणामुळे मोबाईल फोन वापरणं घातक
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण मोबाईल फोन वापरतो, तेव्हा तो अतिनील किरणे वेगाने उत्सर्जित करतो. अतिनील किरण विजेला स्वतःकडे वेगाने आकर्षित करतात. एका वैद्यकीय जर्नलमध्ये यासंबंधित माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
वीज चमकताना मोबाईल फोन बंद ठेवावा
वीज पडून अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना तुम्ही ऐकल्या वाचल्या असतील. बहुतेक वेळा हे लोक पावसात मोबाईल फोन वापरत असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याचं समोर आलं आहे. यामुळेच जेव्हा वीज चमकते, तेव्हा मोबाईल फोन बंद ठेवावा, असं सांगितलं जातं. याशिवाय मोकळ्या आकाशात मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली जाते.
वीज चमकताना इलेक्ट्रॉनिक उपकरणेही बंद करावीत
विजा चमकताना घरातही टीव्ही, फ्रीज, कुलर, स्मार्ट टीव्ही अशी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणं टाळावे आणि ती बंद ठेवावीत. याशिवाय लॅपटॉप विजेलाही आकर्षित करतो, त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडखाली बसून मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळावा. तसेच या पावसाळ्यात विद्युत खांब देखील कंडक्टर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात, कोणत्याही वायरला जोडलेल्या आणि त्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहण्यास सांगितलं जातं.



















