(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Meme Guy : Xavier चे मीम्स तुफान चर्चेत, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स; भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण?
Xavier Meme Guy : तुम्ही Xavier या युजरचे अनेक मीम्स पाहिले असतील. भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर येथे त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Xavier Mystery Meme Guy : इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. सोशल मीडियामुळे आपण एकमेकांसोबत जोडले जातो, याशिवाय याचा उपयोग मनोरंजनासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो. सोशल मीडियावर व्हायरल मीम्समुळे आपलं मनोरंजन होतं. देशातील राजकारण असो अर्थकारण किंवा हॉलिवूड-बॉलिवूड कोणताही विषय असो, त्याबाबतचे भन्नाट मीम्स आपल्याला व्हायरल झालेले दिसून येतात. अशाच प्रकारे चर्चेत आलेला एक युजर म्हणजे झेवियर (Xavier). तुम्ही Xavier या युजरचे अनेक मीम्स पाहिले असतील. भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर येथे त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Xavier या यूजरने असंख्य नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कोणत्याही पोस्टवर सर्वसामान्यांना पडणारे अगदी साधे-सोपे प्रश्न विचारून तसेच कमेंट करत या यूजरने कॉमेडीयनचा दर्जा कमावला आहे, असं म्हणावं लागेल. याचे कमेंट्स किंवा मीम्स वाचून हसून-हसून पोट दुखू लागतं.
Xavier चे काही व्हायरल मीम्स
Xavier हा यूजर मूळचा भारतीय वंशाचा आहे. LifeBeyondNumbers च्या रिपोर्टनुसार, Xavier Meme Guy भारतीय वंशाचा आहे. Xavier नावाने व्हायरल होत असलेल्या या व्यक्तीचं खरं नाव पाकलू पापीतो (Pakalu Papito) आहे. तो अनेक वर्षांपासून भारताबाहेर वास्तव्यात आहे. मात्र तो नेमका कुठला रहिवासी आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, पाकलू पपीतो मिनेसोटा (Minnesota) येथील मिनियापोलिस (Minneapolis) मध्ये एका आयटी फर्ममध्ये काम करतो, असा दावा करण्यात आला आहे.
मित्रांसोबतची पैज ठरली कारण
पाकलू पपीतोने मित्रांसोबत पैज लावली होती. ही पैज अशी होती की, तो ट्विटरवर 5000 फॉलोअर्सचा टप्पा ओलांडू शकत नाहीत. रिपोर्टनुसार, त्याच्या मित्रांनी 10000 डॉलरची म्हणजे सुमारे 8 लाख रुपयांची पैज लावली होती. बालपणापासून लाजरा स्वभाव असणाऱ्या पाकलूसाठी हे चॅलेंज अशक्य आहे, असे त्याच्या मित्रांना वाटले. पण पाकलूने हे चॅलेंज फार गांभीर्याने घेतले. यानंतर त्याने ट्विटरवर भन्नाट कमेंट करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
पाकलू पपीतोच्या या कमेंट्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. यामुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन व्हायला लागलं. यासोबतच पाकलूच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढू लागली. पाकलू पपीतोने अवघ्या काही काळातच ट्विटरवर 5000 फॉलोअर्सचा टप्पा गाठला आणि त्याच्या मित्रांसोबतची पैज जिंकली.
Xavier नावाने फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट
2015 मध्ये पाकलू पपीतोचे ट्विटरवर सुमारे 8 लाख फॉलोअर्स आणि फेसबुक पेजवर 5 लाख फॉलोअर्स होते. दुर्दैवाने, ट्विटर आणि फेसबुकने त्याचे मूळ ट्विटर अकाऊंट हटवले. पण त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट्स आधीच खूप व्हायरल झाले होते. तेव्हापासून अनेक युजर्सेनी त्याचं नाव आणि फोटो वापरून ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट तयार केली आणि अनेक भन्नाट आणि मजेदार ट्विट पोस्ट केले. झेवियर (Xavier) हा त्यापैकीच एक युजर आहे.
दरम्यान, 2020 मध्ये झेवियर (Xavier) नावाने एक फेसबुक पेज सुरु करण्यात आलं. या पेजवर त्याचे आधीचे मीम्स आणि नवनवीन मजेदार मीम्स शेअर करण्यात येतात. सध्या या पेजचे दोन दशलक्षहून अधिक (2.2 Milion) फॉलोअर्स आहेत.