Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये पावसाचा कहर! आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू; कोट्यवधीचं नुकसान
Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, यात किमान 81 जणांचा मृत्यू झाला आहे.
Himachal Pradesh Rain Update: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पुन्हा एकदा पावसाने कहर माजवला आहे. रविवारपासून (13 ऑगस्ट) हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असताना राज्यात ढगफुटी, घरं पडून आणि भूस्खलनामुळे 81 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आणि वाहून गेल्याने सुमारे 13 जण अद्यापही बेपत्ता आहेत. हिमाचलमध्ये पावसामुळे जवळपास 10 हजार कोटींचं नुकसानही झालं आहे.
हिमाचलला पावसाचा तडाखा, 81 जणांचा मृत्यू
पावसाने ग्रासलेल्या हिमाचल प्रदेशातील मृतांची संख्या 81 वर पोहोचली आहे. मंडी (Mandi) जिल्ह्यात आणि राजधानी शिमल्यात (Shimla) मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. शिमला, सोलन, कांगडा आणि मंडीमध्ये दोन ठिकाणी ढगफुटी झाली. अनेक ठिकाणी घरं कोसळल्यामुळे जखमींना वाचवण्याचं आणि ढिगाऱ्यांखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरूच आहे. येते काही दिवस हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
#हिमाचल_प्रदेश में क़यामत का मंजर
— Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) August 15, 2023
वीडियो-2 pic.twitter.com/YAos3HjdHN
हिमाचलमध्ये दोन महिन्यांत 214 मृत्यू
रविवारपासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे, शिमल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलन झालं आहे. समर हिल, फागली आणि कृष्णा नगर या तीन भागांना भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 जूनला पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये एकूण 214 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 38 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
शिवमंदिरात अजूनही काही मृतदेह गाडले गेल्याची भीती
समर हिल आणि कृष्णा नगर भागात बचावकार्य सुरू आहे. सोमवारी कोसळलेल्या समर हिल येथील शिवमंदिराच्या ढिगाऱ्यात अजूनही काही मृतदेह गाडले गेल्याची भीती आहे. समर हिल येथून आतापर्यंत 13 मृतदेह, फागली येथून 5 आणि कृष्णा नगर येथून 2 मृतदेह सापडले आहेत. संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या भीतीने कृष्णा नगरमधील सुमारे 15 घरं रिकामी करण्यात आली असून कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
Do not mute it. Hear the trauma.
— Srishti (@seekingsrishti) August 15, 2023
This video depicts true horrors of Himachal disaster. The Himalayas are collapsing. Why no one is talking about it? pic.twitter.com/XB2id1YYvb
बचावकार्य सुरुच
कांगडा जिल्ह्यातील इंदोरा आणि फतेहपूर विभागातील पूरग्रस्त भागातून गेल्या 24 तासांत 1 हजार 731 जणांना वाचवण्यात आलं आहे, असं उपायुक्त निपुण जिंदाल यांनी बुधवारी सांगितलं. हवाई दलाचे हेलिकॉप्टर, लष्कराचे जवान आणि एनडीआरएफ यांच्या मदतीने पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, असंही जिंदाल यांनी सांगितलं.
उत्तराखंडमध्येही 10 जणांचा मृत्यू
सोमवारी मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्येही भूस्खलन झालं, यात लक्ष्मण झुला येथील एका रिसॉर्टमध्ये एका जोडप्याचं आणि त्यांच्या मुलासह आणखी चार मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. दोन मृतदेह मंगळवारी उशिरा आणि आणखी दोन मृतदेह बुधवारी सापडले. उत्तराखंडमधील पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
हेही वाचा: