किळसवाणा प्रकार! ढाब्यावरील जेवणात आढळला मेलेला उंदीर; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Rat In Chicken Curry : ढाब्यावरील चिकन करीमध्ये उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video : काही चमचमीत खायची इच्छा असल्यावर आपण हॉटेल किंवा ढाब्यावर जाण्याचं ठरवतो. पण हॉटेल आणि ढाबा अशा ठिकाणी स्वयंपाक करताना स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाते की नाही, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. अनेक वेळा हॉटेल आणि ढाबा यांसारख्य ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा झाल्याचं समोर येतो. असाचा काहीसा किळसवाणा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ढाब्यावरील चिकन करीमध्ये उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किळसवाणा प्रकार! चिकन करीमध्ये आढळला मेलेला उंदीर
एका ग्राहकाने ढाब्यावर मागवलेल्या चिकनमध्ये मृत उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या लुधियाना येथील एका ढाब्यावरील हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. मांसाहारी पदार्थामध्ये मेलेला उंदीर आढळल्यावर ग्राहकाने संताप व्यक्त करत या घटने व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ढाबेमालकाचा या निष्काळजीपणावर नेटकऱ्यांकडूनही संताप व्यक्त होत आहे.
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
विवेक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियाणा येथील ढाब्यावर ते त्यांच्या कुटुंबासह गेले होते. यावेळी त्यांनी चिकन करी ऑर्डर केली. जेवणाचा काही भाग खाल्ल्यानंतर त्यांना जेवणाबाबत संशय आला. जेवणात काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात मेलेला उंदीर पाहून त्यांना धक्काच बसला. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा विवेकने रेस्टॉरंटच्या मालकाकडे हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्याला वाईट वागणूक मिळाली आणि धमकीही देण्यात आली. त्यानंतर, विवेक कुमार यांनी या घटनेची व्हिडीओद्वारे रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
Parkash dhaba Ludhiana. India Serve rat in chicken curry. Restaurant owner bribe the food inspector and go free??? Very poor standards in Kitchen of many Indian restaurants. Be aware . pic.twitter.com/chIV59tbq5
— NC (@NrIndiapolo) July 3, 2023
जेवणामुळे कुटुंब पडलं आजारी
दरम्यान, या प्रकरणी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फील्ड गंज परिसरातील प्रेम नगर येथील रहिवासी विवेक कुमार यांना त्यांच्या जेवणात मृत उंदीर आढळला. यानंतर विवेक कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे लुधियाना शहर पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध एफआयआर नोंदवून तात्काळ कारवाई केली आहे. विवेक कुमार यांनी सांगितलं की, रविवारी रात्री उशिरा विश्वकर्मा चौकाजवळील प्रकाश ढाब्यावर त्याने ऑर्डर केलेल्या ताटात मेलेला उंदीर आढळल्याने ते आणि त्याचं कुटुंब आजारी पडलं.