Budget 2022: कोरोनामुळे आरोग्य क्षेत्राच्या मर्यादा समोर; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि बंगालच्या बजेटमध्ये काय तरतूदी आहेत?
Maharashtra Budget 2022: महाराष्ट्रासोबतच पश्चिम बंगाल, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्याचे बजेट सादर झालं आहे. त्यामध्ये या राज्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी काही तरतूदी केल्या आहेत.
मुंबई: देशात गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि त्यामुळे देशातील आरोग्य क्षेत्राच्या मर्यादा या समोर आल्या. त्यामध्येही महाराष्ट्र आणि केरळ राज्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. महाराष्ट्राने शुक्रवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. त्याचसोबत पश्चिम बंगाल, केरळ आणि मध्य प्रदेशचाही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या चारही राज्यांना कोरोना काळात मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. आता या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी या चारही राज्यांनी आरोग्य क्षेत्रात काही तरतूदी केल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आरोग्यासाठी काय तरतूद?
पश्चिम बंगाल 3.21 लाख कोटींचा बजेट सादर करण्यात आला. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी 17,567.90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना, आरोग्य क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, या क्षेत्रात मनुष्यबळ वाढवणे आणि विविध योजनांचा निधी वाढवणे या गोष्टींचा समावेश आहे.
कोरोनावर नियंत्रणासाठी आतापर्यंत केरळने 1,913 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 760 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या ही 3280 वरुन 32,081 वर गेली आहे.
राज्यामध्ये सहा नवीन मेडिकल कॉलेजना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये एमबीबीएसच्या 600 जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर सहा ट्रॉमा सेंटरना मंजुरी देण्यात आली आहे.
केरळमध्ये आरोग्यासाठी काय तरतूद?
केरळमध्ये आरोग्य व्यवस्थेसाठी 2629 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये 50 कोटी रुपये व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणजे विषाणू संस्थेसाठी देण्यात येणार आहेत. तिरुअनंतपूरममध्ये रिजनल सेंटर फॉर कॅन्सरची स्थापना करण्यात येणार आहे. मलाबार कॅन्सर सेंटरसाठी 28 कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील मेडिकल कॉलेजस साठी 250 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. संपूर्ण राज्यभर डिजिटल हेल्थ मिशन या योजनेची अंमलबजावणी वेगाने करण्यात येणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं.
मध्य प्रदेशमध्ये आरोग्यासाठी काय तरतूद?
मध्य प्रदेशमध्ये 22 नवीन मेडिकल कॉलेजेस सुरु करणार असल्याची घोषणा मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी केली. एकाच वेळी एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असावी. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी राज्याचं बजेट सादर केलं. यात 22 नवी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. ही मेडिकल कॉलेज श्योपुर, राजगड, मंडला, सिंगरौली, सिवनी, नीमच, मंदसौर, दमोह, छतरपूर या जिल्ह्यात सुरु करण्यात येतील. सोबतच राज्यात MBBSच्या जागा 3250 इतक्या होतील. आरोग्य क्षेत्रासाठी तब्बल 13,642 कोटी रुपयांचं बजेट प्रस्तावित केलं आहे.
महाराष्ट्रात आरोग्यासाठी काय तरतूद?
राज्यात आरोग्य सेवांवर येत्या तीन वर्षात 11 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे, असं त्यांनी सांगितलं. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसंच पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, जेणेकरुन सगळ्या उपचारपद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं.
- राज्यात 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने- 8 कोटी खर्च.
- नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारण्यासाठी भांडवली खर्चासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी.
- सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला रुग्णालये - हिंगोली, यवतमाळ, सांगली, सातारा, धुळे, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारणार.
- ग्रामीण भागातील रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देणार, 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन वर्षात सुरु करणार, त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद.
- 60 शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची उपचारपद्धती.
- आनंदीबाई जोशी यांना स्मरुण देशातील होतकरु विद्यार्थ्यांना इथेच प्रवेश मिळावा. मुंबईत सेंट जॉर्ज, नाशिक आरोग्य विज्ञान संस्था, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर संस्था उभारणार.
- पुणे शहरात 300 एकर जागेत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळ्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार.
- जालना इथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे, या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढे ही सेवा उपजिल्हा रुग्णालयातही उपलब्ध होईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha