Nitin Gadkari : गडकरीचं वजनदार चॅलेंज! भाजप खासदारानं 16 किलो वजन घटवले
Union Minister Nitin Gadkari : उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया सध्या चर्चेत आहेत, त्याला कारणही तसेच आहे.
Union Minister Nitin Gadkari : उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया सध्या चर्चेत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. अनिल फिरोजिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चॅलेंज स्वीकारुन तब्बल 16 किलो वजन कमी केलेय. नितीन गडकरी 24 फेब्रुवारी रोजी उज्जैनच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं चॅलेंज दिलं होतं. एक किलो वजन कमी केल्यानंतर एक हजार कोटींचा विकासनिधी देतो, असे गडकरी यांनी फिरोजिया यांना सांगितलं होतं.
नितीन गडकरी यांच्या चॅलेंजनंतर 130 किलोच्या अनिल फिरोजिया यांनी फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. ते दररोज व्यायाम करायला लागले, त्यांनी सध्या तब्बल 16 किलो वजन कमी केले. अनिल फिरोजिया दररोज व्यायाम करतात आणि आठ किमी चालतात, त्यानंतर त्यांनी तीन महिन्यात तब्बल 16 किलो वजन कमी केले आहे. सध्याच्या घडीला त्यांना आता गडकरी यांच्याकडून 16000 कोटी रुपयांचं विकासकाम मिळू शकते. पण अनिल फिरोजिया हे आपलं वजन 100 किलो पेक्षा कमी झाल्यानंतर नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये नितीन गडकरी यांनी अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान केले होते. गडकरी यांच्या चॅलेंजनंतर फिरोजिया यांनी तात्काळ व्यायामला सुरुवात केली. त्याशिवाय आहारावरही लक्ष केंद्रीत केले. तीन महिन्यांपासून फिरोजिया कठोरपणे नियमांचं पालन करत आहेत. वजन कमी झाल्यानंतर सध्या ते चर्चेत आहेत. 100 किलोपेक्षा कमी वजन झाल्यानंतर फिरोजिया गडकरी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
BJP MP from Ujjain @bjpanilfirojiya is on a mission to shed excess flab, not just to become fit, but also to fund the development of his Lok Sabha constituency as promised by Union Minister @nitin_gadkari @ndtv @ndtvindia pic.twitter.com/t7qv7K0FAB
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) June 11, 2022
अनिल फिरोजिया यांचा डायट -
वजन कमी करण्यासाठी अनिल फिरोजिया यांनी सख्तीने डायट सुरु केला. दररोज व्यायाम करायचे. त्यानंतर आठ किलोमीटर चालणे.. तसेच दररोज जेवणात फक्त एक रोटी आणि सलाड घेत होते.
जगातील सर्वात महागडा खासदार -
प्रसारमाध्यमांशी बोलताना फिरोजिया यांनी जगातील सर्वात महागडा खासदार असल्याचा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी उज्जैनच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. मी जवळपास 16 किलो वजन कमी केलेय. त्यामुळे मला आशा आहे की आम्हाला विकास कामांसाठी आणखी निधी मिळेल, असे फिरोजिया म्हणाले.
गडकरी काय म्हणाले होते?
24 फेब्रुवारी 2022 रोजी नितीन गडकरी उजैन येथे विकासकामाच्या उद्धाटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी फिरोजिया यांना एक अट घातली होती. ते फिरोजिया यांना म्हणाले की, माझं वजन तुमच्यापेक्षा जास्त होते. माझं वजन 135 किलो होतं. आता माझं वजन 93 किलो आहे. तुम्ही जितके किलो वजन कमी कराल तितका निधी तुम्हाला मिळेल. प्रति एक किलो 1000 कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जाईल. तुम्ही जितके किलो वजन कमी कराल, तितका निधी तुम्हाला मिळेल.