(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : सिकलसेल बाबत अधिक जनजागृती करण्याची गरज, आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांचे आवाहन
सिकलसेल एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणार नाही, याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असून या बाबत अधिक जनजागृतीची गरज असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांनी सांगितले.
नागपूर : डागा स्मृती स्त्री व बाल शासकीय रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. या आजाराची माहिती, व्याप्ती, उपाययोजना, उपचारपद्धत याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक डॉ. विनिता जैन होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांची उपस्थिती होती.
सिकलसेल हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणार नाही, याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. या आजारावरची उपाययोजना, या आजाराबद्दलची जनजागृती या आजारासाठीचे आवश्यक समुपदेशन, अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी उपसंचालकांनी व्यक्त केली. सिकलसेल रुग्ण ज्यांचे वय 9 महिन्याच्या वर आहे, असे सर्व रुग्णांनी ह्येड्रॉक्सयुरिया नावाची औषधी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच प्रत्येकाने आपली सिकलसेलची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. पुढील पिढीपर्यंत हा आजार नाही पोहोचणार हेच उद्दिष्ठ असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डागा हॉस्पिटलमध्ये समुपदेशनाचे कार्य उत्तम प्रकारे होत आहे. अधिक चांगल्या प्रभावी पद्धतीने प्रचार-प्रसार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी थोरात यांनी व्यक्त केली. गर्भावस्थेत गरोदर स्त्रीने काय काळजी घ्यायला पाहिजे, या बद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक गरोदर स्त्रीची सिकलसेलची तपासणी होणे हे खूप महत्वाचे आहे. तसेच जर ती स्त्री सिकल सेल वाहक किंवा ग्रासित असेल तर आपल्या पार्टनरची तपासणी लगेच करून घेणे. आहारामधे हिरव्या पाल्यभज्या, बिट, गाजर, पालक इत्यादीचा अधिक समावेश करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा पारवेकर यांनी लवकरात लवकर सीव्हीएस तपासणी डागा रुग्णालय येथे सुरु होणार असल्याची माहीती त्यांनी दिली. सिकलसेल निर्मूलन एक सामाजिक कार्य असून यासाठी सामाजिक दायित्वातून प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्याकडे सोपवलेल्या कामाव्यतिरिक्त प्रचार प्रसारही करावा, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. डॉ राजरत्न वाघमारे यांनी आपल्या शरीरात रक्तात होणारे बदलामुळे सिकलसेल रुग्ण आपल्याला दिसतात. याबद्दल विस्तारित माहिती दिली. तर सिकलसेल रुग्णांना शासकीय योजनाचे प्राप्त होणारे लाभ, जिल्ह्याभरात सध्या सुरू असलेला प्रचार प्रसार, रुग्णांचे समुपदेशन व त्यामुळे होणारा लाभ याबाबत या जिल्हा सिकलसेल समुपदेशक संजीवनी सातपुते यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, सामान्य जनता व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जवळ जवळ 150 च्या वर नागरिकांनी या तपासणी कार्यक्रमाचा लाभ घेतला जिल्हा समन्व्यक प्राजक्ता चौधरी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके प्रामुख्याने उपस्थित होत्या.