Shivsena : ठाकरे-पवारांचं लक्ष्य शिंदेंचं ठाणे? पवारांनी दौऱ्याचा नारळ फोडला, ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवातही ठाण्यातून
Thane : एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून ते ठाण्यापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.
ठाणे: राज्यातील सर्वाधिक म्हणजे सहा महापालिका या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यापैकी चार पालिकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आहे. एका पालिकेत भाजपची तर एका पालिकेत राष्ट्रवादीची ताकद आहे. मुंबईनंतरची शिवसेनेची सर्वाधिक ताकद असलेला हाच ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्याचं हेच राजकीय महत्व ओळखून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हेदेखील त्याच्या दौऱ्याची सुरवात याच ठिकाणाहून करणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आणि याचा नारळ फोडलाय तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात. आज त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली. दुसरीकडे गणपतीनंतर उद्धव ठाकरेही एकनाथ शिंदेंच्या याच बालेकिल्ल्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची सर्वाधिक ताकद आहे. त्यानंतर दुसरी म्हणजे राष्ट्रवादीची ताकदही आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक पालिकांमधील नगरसेवक हे शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यामुळेच पुन्हा शिवसेनेची मुळं घट्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठाण्यापासून दौऱ्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असावा.
ठाकरे आणि पवारांच्या या ठाणे दौऱ्यावरुन शिंदे गट मात्र आक्रमक झाला आहे. ठाकरे आणि पवारांनी ठाण्याचीच निवड केल्यानं एकनाथ शिंदेंसमोर ते मोठं आव्हान असणार आहे.
ठाकरे-पवारांनी त्यांच्या दौऱ्यासाठी ठाण्याचीच निवड का केली?
- मुंबईनंतरचा राजकीय दृष्ट्या मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा.
- ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महापालिका.
- ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभेच्या जागा
- ठाणे पालिकेतच शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली.
- तिथेच शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड झालं आहे.
आता शिवसेनेचा तोच गड पुन्हा एकदा आपल्यासोबत आणण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
महापालिकेत नगरसेवक कुणासोबत?
- ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, पण बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
- कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, पण बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
- नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
- उल्हासनगर महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
- भिवंडी महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
- मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
राज्यात सत्ता शिंदे आणि भाजपची आहे. ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच पालिकांवर भाजप आणि शिंदेंचा वचक आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता जो ठाणे जिंकेल तो राज्यात सत्ता स्थापन करेल असंच काहीसं गणित आहे. त्यामुळेच सर्वांचं लक्ष आता ठाण्यावर आहे.