मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा अर्थसंकल्प जाहीर; ठाणेकरांच्या पदरात काय पडले? एका क्लिकवर
TMC Budget : कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला.
Thane Municipal Corporation Budget : कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला. प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अर्थसंकल्प मांडला. भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन असलेला सन 2022- 2023 चा सुधारित 4235 कोटी 83 लक्ष रूपयांचा तर सन 2023-2024 सालचा 4370 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करीत मंजूर केला.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या त्रिसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, भांडवली कामातंर्गत घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, कामांचा दर्जा उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे -
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना
अमृत योजना 2 पाणीपुरवठा व्यवस्था
क्लस्टर योजना
पार्किंग प्लाझा येथे मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल
महापालिका सुरू करणार सीबीएससी शाळा
सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण
झोपडपट्टी तेथे वाचनालय
कामांचा दर्जा उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष
महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत :
1) मालमत्ता कर :-
मालमत्ता कर व फी पासून सन 2022-23 मध्ये रु.713 कोटी 77 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. आतापर्यंतचे प्रत्यक्ष उत्पन्न रु. 599 कोटी 73 लक्ष विचारात घेवून मालमत्ता करापासून रु.677 कोटी 27 लक्ष उत्पन्नाचे सुधारित अंदाज करण्यात आले आहे. सन 2023-24 मध्ये मालमत्ता कर व फीसह रु. 761 कोटी 72 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे.
2) विकास व तत्सम शुल्क :-
सन 2022-23 मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी रु.585 कोटी 42 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देणेकरीता अतिरिक्त भुनिर्देशांकावर आकारण्यात येणा-या तसेच इतर प्रिमियमच्या (अधिमुल्य) शुल्काची 50% रक्कम दि.31/12/2021 पूर्वी भरणा केल्यास उर्वरित 50% रक्कमेची सवलत देण्याचा निर्णय जाहिर केला. मोठया विकासकांकडून सवलतीचा लाभ घेण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव सवलत काळातच मंजूर झालेले आहेत. तसेच नविन नियमावलीनुसार काही शुल्काचे दर कमी झालेले असल्यामुळे व काही बाबी भुनिर्देशांकात समाविष्ट झाल्याने त्यापोटी मिळणारे अधिमुल्यात घट झाली आहे. शहर विकास विभागाकडून प्राप्त झालेले रु.387 कोटी 51 लक्ष विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रु.458 कोटी 68 लक्ष सुधारित करण्यात आले आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात रु. 565 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे.
3) स्थानिक संस्था कर :-
स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु. 979 कोटी 39 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.250 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु. 10 कोटी असे एकूण रु. 1239 कोटी 39 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू व सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत असून आतापर्यंत प्रत्यक्षात रु. 979 कोटी 44 लक्ष प्राप्त झाले आहेत. परंतु मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अपेक्षित धरलेल्या अनुदानापैकी आतापर्यंत रु. 108 कोटी 63 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने मुद्रांक शुल्कापोटी सुधारित अंदाज रु. 175 कोटी अपेक्षित केले आहे. तसेच स्थानिक संस्था कराच्या मागील थकबाकी वसुलीपोटी अपेक्षित उत्पन्नापैकी आतापर्यंत रु. 4 कोटी 36 लक्ष प्राप्त झाले असल्याने सुधारित अंदाज रु.8 कोटी 04 लक्ष करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज एकूण रु. 1162 कोटी 48 लक्ष अपेक्षित केले आहेत
तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी वस्तू व सेवाकर अनुदानापोटी रु. 1057 कोटी 79 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान रु.200 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली रु.10 कोटी असे एकूण रु. 1267 कोटी 79 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
4) पाणीपुरवठा आकार
पाणी पुरवठा आकारासाठी सन 2022-23 मध्ये रु. 200 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. पाणी पुरवठा आकाराचे प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न रु. 95 कोटी 08 लक्ष विचारात घेता सुधारित अंदाज रु. 160 कोटी अपेक्षित केले असून सन 2023-24 मध्ये रु. 225 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
5) अग्निशमन दल :-
अग्निशमन विभागाकडून मूळ अंदाज रु. 104 कोटी 80 लक्ष अपेक्षित केले होते. आतापर्यंत प्रत्यक्ष रु.119 कोटी 95 लक्ष प्राप्त झाले असून उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्याने रु. 129 कोटी 05 लक्ष सुधारित अंदाज प्रस्तावित केले आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रु. 132 कोटी 03 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.
6) स्थावर मालमत्ता विभाग :-
सन 2022-23 या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.21 कोटी 05 लक्ष अपेक्षित केले होते. आतापर्यंत रु. 6 कोटी 85 लक्ष प्रत्यक्षात उत्पन्न प्राप्त झाले असल्याने स्थावर मालमत्ता विभागाचे सुधारित अंदाज रु.17 कोटी 10 लक्ष अपेक्षित केले आहे. सन 2023-24 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु. 19 कोटी 65 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
7) जाहिरात फी :-
जाहिरात फी पोटी सन 2022-23 मध्ये रु. 22 कोटी 37 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न रु.8 कोटी 15 लक्ष झाले असल्याने सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फी पासून रु.14 कोटी 38 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले असून सन 2023-24 मध्ये रु.22 कोटी 37 लक्ष उत्पन्न अंदाजित केले आहे.
8) अनुदाने :-
शासनाकडून आतापर्यंत रु.512 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधांतर्गत शहर सौंदर्यीकरणासाठी रु.130 कोटी, पंधराव्या वित्त आयोगाकडून रु.49 कोटी 91 लक्ष व हवा गुणवत्ता अनुदानापोटी रु.25 कोटी 52 लक्ष , पायाभुत सुविधांतर्गत विशेष अनुदानापोटी रु.179 कोटी 66 लक्ष, अल्पसंख्यांक बहुल विकास निधी पोटी रु.29 कोटी 05 लक्ष ही अतिरिक्त अनुदाने प्राप्त झाल्याने अंदाजपत्रकात रु.579 कोटी 81 लक्ष सुधारित उत्पन्न अपेक्षित केले आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रु. 460 कोटी 05 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधेंतर्गत रस्ते विकसन रु.214 कोटी पैकी रु.50 कोटी, रस्ते विकसनापोटी रु.391 कोटी पैकी रु.50 कोटी , दिवा मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा (रिमॉडेलिंग) व जलकुंभ बांधणे साठी रु. 240 कोटी 29 लक्ष पैकी रु.50 कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नुतनीकरणापोटी रु.25 कोटी , पंधरावा वित्त आयोग रु.50 कोटी, पायाभुत सुविधेसाठी रु.25 कोटी , MMRDA कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत रु.25 कोटी इत्यादींचा समावेश आहे.
9) म्युनिसिपल बॉन्ड :-
आजमितीस महापालिकेवर रु. 95 कोटी 55 लक्ष कर्ज शिल्लक आहे. केंद्र शासनाने अमृत 2 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारासाठी डिपीआर मंजूर केला असून या अंतर्गत केंद्र शासनाचा 25%, राज्य शासनाचा 25% व महापालिकेचा 50% हिस्सा असणार आहे. महापालिका 50% हिस्स्यापोटी म्युनिसिपल बॉन्ड उभारुन निधी उपलब्ध करुन घेणार आहे. म्युनिसिपल बॉन्ड उपलब्ध करुन घेतल्यास केंद्र शासनाकडून सबसिडी रक्कम देखील उपलब्ध होणार आहे. यासाठी रु. 200 कोटी कामाच्या प्रगतीनुसार म्युनिसिपल बॉन्ड उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. तुर्त सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.50 कोटी म्युनिसिपल बॉन्ड पासून अपेक्षित करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी दि.1.4.2022 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट आहे. तसेच सन 22-23 मध्ये केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2022-23 मध्ये शिल्लक राहणारी अखर्चित रक्कम सन 2023-24 च्या आरंभिच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अशाप्रकारे सन 2022-23 मध्ये आरंभिच्या शिल्लकेसह सुधारित अंदाजपत्रक रु. 4235 कोटी 83 लक्ष व सन 2023-24 मध्ये आरंभिची शिल्लकेसह मूळ अंदाज रु.4370 कोटी जमा बाजूस अपेक्षित केले आहे.
खर्च बाजू
सन 2022-23 मध्ये पूर्ण झालेले प्रकल्प
1) कळवा खाडीवरील पूलाच्या 5 मार्गिका
2) खारेगाव रेल्वे क्रॉसिंगवरील पूल
3) 100 खाटांचे कौसा रुग्णालय
4) पातलीपाडा एस.टी.पी. (59 एम.एल.डी.)
5) 8 जलकुंभ व 1 जीएसआर
6) प्रदुषणविरहित विजेवरील 23 बसेस व सीएनजी इंधनावरील 20 बसेस एकूण 43 बसेस
7) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवा प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया विभाग
8) स्मार्ट सिटी योजनेतील गावदेवी भूमिगत वाहनतळ
9) स्मार्ट सिटी योजनेतील कोलशेत साकेत – बाळकुम, कळवा शास्त्रीनगर ते कोपरी खाडी किनारा सुशोभीकरण
सन 2023-24 मध्ये प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन महसुली खर्चात कपात करुन भांडवली कामाचे दायित्व कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. खर्चाच्या प्रमुख बाबींचा तपशील पुढील प्रमाणे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान
1) स्वच्छ ठाणे
1.1) संपूर्णत: नवीन कचरा संकलन यंत्रणा - शुन्य कचरा मोहिम :-
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन चार चाकी घंटागाडया, सहाचाकी घंटागाडया व कॉम्पॅक्टरद्वारे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणाचा कचरा संकलीत करणेकरीता कचरा वेचकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर कामाची गुणवत्ता वाढवून शहर कचरामुक्त (शुन्यकचरा) करणेकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेसाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर संस्थेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार घंटागाडया व कॉम्पॅक्टरच्या संख्येत वाढ करून शहर कचरामुक्त (शुन्यकचरा) करण्यात येणार आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.80 कोटी व कचरा वेचक मानधनासाठी रु.4 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
1.2) हस्तांतरण स्थानक (Transfer Station):-
दिवा व मुंब्रा वगळता संपुर्ण शहरातील कचरा चारचाकी, सहाचाकी घंटागाडया व कॉम्पॅक्टरमार्फत सी.पी तलाव येथील हस्तांतरण स्थानक येथे संकलीत करून स्टेशनरी कॉम्पॅक्टर मार्फत क्षेपणभूमी पर्यंत वाहतुक करण्यात येत आहे. सी.पी.तलाव येथील हस्तांतरण स्थानकाचे संपूर्णत: अद्ययावतीकरण करुन इंदौर शहरातील हस्तांतरण स्थानकाच्या धर्तीवर त्याचे परिचलन करणे प्रस्तावित आहे.
यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.23 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
1.3) संपूर्णत: नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प :-
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेकरीता मौजे डायघर येथे प्रकल्प उभारण्यात येत असून सदर प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून याद्वारे कचरा विल्हेवाट लावणेसाठीची पूर्ण प्रक्रीया ( Material Recovery Facility Centre) करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा ( कच-यापासून विजनिर्मिती) मे 2024 पर्यत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.45 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
1.4) दिवा क्षेपणभूमी :-
ठाणे शहरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट दिवा साबे येथील जागेवर लावण्यात येत होती. सदर ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा 30 जानेवारी 2023 पासून बंद करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत मौजे भंडार्ली येथे शास्त्रोक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. मौजे दिवा साबे येथे टाकण्यात आलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणेकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून सदर प्रकल्पाचे काम येत्या 3 महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
या कामांसाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.10 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
1.5) सार्वजनिक रस्ते साफसफाई :-
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण रस्त्यांपैकी 270 किमी लांबीच्या रस्त्यांची सफाई कंत्राटी पध्दतीने करण्यात येते तर उर्वरित रस्त्यांची सफाई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कायम कामगारांमार्फत करण्यात येते. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच वाणिज्य क्षेत्रात दिवसातून दोन वेळा सफाई करण्यात येते. सदरचे काम अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने पुन्हा नव्याने नियोजन करून सर्व समावेशक निविदा मागविण्यात येत आहेत. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.85 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
2) स्वच्छ शौचालय
2.1) शौचालय नुतनीकरण व पुनर्बांधणी :
ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात एकूण 915 शौचालये असून या शौचालयांतर्गत 12,710 सीट्सची संख्या आहे. यातील या आर्थिक वर्षात 762 शौचालयांचे (9,561 सीट्सचे) नुतनीकरण व पुनर्बांधणी करण्याकरीता रु. 81 कोटीचे नियोजन केलेले आहे. यामध्ये 8,626 सिट्सचे 692 शौचालयांचे नुतनीकरण करणे व 935 सिट्सचे 70 शौचालयांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
2.2) सामुदायिक / सार्वजनिक शौचालय :-
ठाणे शहरातील सामुदायिक / सार्वजनिक शौचालय 24 तास स्वच्छ राहणे करीता आवश्यक स्थापत्य व विद्युत कामे करून घेण्यात येत आहेत. प्रत्येक शौचालयाच्यावर ओव्हरहेड टँक बसवून 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शौचालयाची 24 तास सफाई व निगा देखभाल करणेकरीता सर्वसमावेशक (Comprehensive) निविदा मागविण्यात येत आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.10 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
2.3) कंटेनर शौचालय :
महापालिका कार्यक्षेत्रांतील 8 प्रभाग समितीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एकूण 28 बैठे कंटेनर शौचालयांमध्ये 170 सिट्स उभारण्यात येणार असून सदर शौचालयांचा वापर झोपडपट्टी क्षेत्र, वर्दळीची ठिकाणे, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी करणे प्रस्तावित आहे. यासाठी रु.5.50 कोटी खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च प्राप्त अनुदानातून करण्यात येणार आहे.
3) खड्डेमुक्त ठाणे
3.1) मजबूत रस्त्यांचे जाळे :
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या मालकीचे 384 कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 205 कि.मी. लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. चे आहेत व उर्वरित डांबरी रस्ते आहेत.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण ठाण्यात मजबूत रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यामध्ये शासनाकडून पहिल्या टप्प्यात रु.214 कोटी व दुस-या टप्प्यात रु.391 कोटी असे एकूण रु.605 कोटी अनुदान मंजूर झालेले आहे. या अनुदानातून शहरातील 283 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यामध्ये 10.46 कि.मी. काँक्रीट रस्ते, 59.31 कि.मी. युटीडब्ल्यूटी व 46.77 कि.मी. डांबरी रस्ते व 19.12 कि.मी. चे मास्टीक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात येत असून यामध्ये महापालिका परिक्षेत्रातील प्रभाग समितीमधील रस्त्यांचा समावेश आहे. ही सर्व रस्त्यांची कामे मे 2023 पुर्वी पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या निधीमधून महापालिकेच्या अखत्यारीतील असलेले इतर सर्व प्रकारचे रस्ते सुस्थितीत राखण्याकरीता डांबरीकरण पद्धतीने रिसरफेसिंग, सिमेंट काँक्रीटीकरण व यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. ही सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करुन तद्नंतर महापालिकेच्या रस्त्यावर येत्या पावसाळयामध्ये खड्डे पडणार नाहीत याची दक्षता घेऊन खड्डे मुक्त ठाणे करण्याचा संकल्प आहे. यासाठी अंदाजपत्रकात विविध लेखाशीर्षांतर्गत तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्यत्वे तरतुदी पुढीलप्रमाणे.
पायाभूत सुविधेंतर्गत रस्ते विकसन (रु.214 कोटी) रु.50 कोटी
पायाभूत सुविधेंतर्गत रस्ते विकसन (रु.391 कोटी) रु.50 कोटी
विकास आराखडयातील रस्ते बांधणे रु.60 कोटी
यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीने रस्ते नुतनीकरण रु.60 कोटी
मिसिंग लिंक रु.40 कोटी
रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण रु.45 कोटी
रस्ता रुंदीकरण व नुतनीकरण रु.25 कोटी
3.2) सिमेंट काँक्रीट रस्त्यातील अंतर सांधे (Expansion Joint) भरणे :
महापालिका परिक्षेत्रात सध्यस्थितीत 205 कि.मी. चे रस्ते हे सिमेंट काँक्रीट व यु.टी.डब्ल्यू.टी. पद्धतीचे बांधलेले आहेत. या रस्त्यातील कापलेला विस्तार जोड (Expansion joint) कालांतराने उंच सखल होत असतो. यामुळे दुचाकी व रिक्षा यांना वाहन चालविणे अडचणीचे ठरुन असून अपघात होण्याची शक्यता असते. असे अपघात टाळण्याकरीता सिमेंट काँक्रीट व यु.टी.डब्ल्यू.टी. रस्त्यातील अंतर विस्तार जोड (Expansion joint) भरणेचे काम प्रगतीपथावर असून यापुढे भविष्यात सुद्धा हाती घेण्याचे प्रयोजन आहे.
3.3) इतर संस्थांशी समन्वय :
महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेव्यतिरिक्त 36 कि.मी. लांबीचे रस्ते इतर शासकीय संस्थांच्या मालकीचे आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – पुर्व द्रुतगती महामार्ग आनंदनगर ते माजिवडा जंक्शन 5 कि.मी. व तीन हात नाका फ्लायओव्हर
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण – कल्याण फाटा ते रिव्हरवुड – 3.5 कि.मी. व नितीन कंपनी व कापूरबावडी फ्लायओव्हर
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन घोडबंदर रोड – 11 कि.मी. (माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ फ्लायओव्हर ) व मुंब्रा बायपास – ठाणे कल्याण रेल्वे स्लो ट्रॅक आर.ओ.बी. ते वाय जंक्शन – 6 कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण – माजिवडा जंक्शन ते खारेगाव टोल नाका 6 कि.मी.
महाराष्ट्र औदयोगिक विकास प्राधिकरण - शीळ जंक्शन ते महापे रोड ते कल्याण फाटा – 2 कि.मी.
या शासकीय संस्थांच्या मालकीच्या रस्त्यांची निगा व देखभाल संबंधित संस्थांमार्फत करणेबाबत महापालिकेमार्फत नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत असून पावसाळा कालावधीत या रस्त्यांवर खड्डे पडू नये याबाबत महापालिकेमार्फत सदर संस्थांबरोबर समन्वय ठेवून कामाचे सनियंत्रण ठेवले जात आहे.
3.4) चरांचे पुनर्पुष्टीकरण :
वाढत्या ठाण्याबरोबर प्रगतशील जीवनमानाकरीता तंत्रज्ञान सुद्धा तेवढेच आवश्यक ठरते. बदलत्या तंत्रज्ञानाकरीता वेळोवेळी ठाणे महापालिका परिक्षेत्रात महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ, महानगर टेलिफोन निगम, महानगर गॅस तसेच 4 G व 5 G ब्रॉडबॅन्ड सेवा पुरविणा-या संस्था रस्त्याच्या कडेला चर खोदून त्यांच्या सेवा वाहिन्यांचे जाळे पसरवित असतात. या मुळे रस्त्यांची रुंदी कमी होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या चरांचे पुनर्पुष्टीकरण तातडीने हाती घेऊन रस्ते पुर्ववत करण्यासाठी महापालिका या संस्थांकडून पुनर्पुष्टीकरणाचे शुल्क आकारत असते. यासाठी स्वतंत्र बँक खाते ठेवून त्याच खात्यातून रस्त्यांचे पुनर्स्थापनेचे काम करण्याचे नियोजन आहे. ज्या रस्त्यांसाठी संबंधित संस्थांनी रक्कम भरली आहे त्याच रस्त्यांची कामे या शुल्कातून करण्याचे प्रयोजन आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.15 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
3.5) रस्त्यांच्या कामांचा दर्जा सर्वोत्तम रहावा यासाठी विशेष लक्ष :
महापालिका हद्दीत सुरु असलेल्या सर्व प्रकारच्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच या कामांचे त्रयस्थ लेखापरिक्षण (Third Party Audit) शासकीय तंत्रज्ञान संस्था जसे IIT पवई, COEP पुणे, VJTI मुंबई यांचे मार्फत केले जाणार आहे. रस्त्यांच्या दोष दायित्व कालावधी मध्ये ( Defect Liability Period) रस्त्यांवर खड्डे पडल्यास मोठया प्रमाणात आर्थिक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
4) सुंदर ठाणे
4.1) शहर सौंदर्यीकरण :
ठाणे महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत एकात्मिक शहर सौदर्यीकरण करणेसाठी शासनाकडून पायाभुत सुविधेंतर्गत रु.130 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदानातून शहर सौंदर्यीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. ठाणे शहरातील दोन प्रमुख प्रवेश मार्ग आनंदनगर- कोपरी व गायमुख, घोडबंदर रोड येथे प्रवेशद्वार व सुशोभीकरणाची कामे करणे. ठाणे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर माहिती व सूचनाफलक लावणे, कचरा कुंडीची सुविधा, रेलिंग, बैठक व्यवस्था इ. कामे करणे. शहरातील रस्ते एकत्र येतात अशा 24 ठिकाणी वाहतूक बेटे तयार करुन त्यांचे सुशोभीकरण करणे. शहरामधील पूल व उड्डाणपूल, खाडीवरील पूल यांच्या सौंदर्यीकरणासाठी रंगीत प्रकाश असणारे विदयुत यंत्रणा तयार करुन बसविणे. शहरातील प्रमुख शासकीय इमारतींसाठी विदयुत रोषणाईची व्यवस्था व रंगरंगोटी करणे. मियावाकी तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्षलागवड करुन लहान लहान स्थानिक प्रजातीची जंगले निर्माण करणे. शहराच्या विविध भागातील संरक्षक भिंती तसेच दर्शनी भागांवर विविध विषयांवर आधारित भित्तीचित्रे व इतर चित्रांच्या मदतीने सुशोभीकरण करणे. 5 वर्षाचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.30 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
4.2) ठाणे - स्वच्छ व सुंदर तलावांचे शहर :
एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरण
ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 37 तलाव आहेत. तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराचा नावलौकीक आहे. अमृत 2 योजनेतील Water Bodies Rejuvenation अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 15 तलावांची एकूण रु. 59.94 कोटी - राज्य शासन - 25% (14.98 कोटी), केंद्र शासन - 25% (14.98 कोटी), मनपा - 50% - (29.98 कोटी) कामे हाती घेण्यात आली आहेत.
यामध्ये तलावास - संरक्षण (गॅबियन) भिंत, कुंपण भिंत, बैठक व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, पदपथ, रेलिंग, एरीएशन फाऊंटन (कारंजे), विद्युतीकरण, सुरक्षा व्यवस्थेकरीता सी.सी.टी.व्ही. व साऊंड सिस्टीम,जलशुद्धीकरण व्यवस्था,उद्यान विषयक कामे करणे, झाडे लावणे, रंगरंगोटी करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.10 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
4.3) सी.एस.आर. माध्यमातून तलाव संवर्धन :
ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरातील तलावांचे संवर्धन करण्यात येत असून या उपक्रमात ग्रीन यात्रा या समाजसेवी संस्थेद्वारे विविध तलावांचे सीएसआर अनुदानातून संवर्धन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेवर कोणताही आर्थिक भार असणार नाही. ग्रीन यात्रा ही समाजसेवी संस्था पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्याद्वारे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी मियावाकी वृक्ष लागवड, तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात देखील सदर संस्थेद्वारे मियावाकी वृक्ष लागवड व तलावांचे संवर्धन करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात शहरातील 7 तलावांच्या संवर्धनाचे काम घेणेचे प्रस्तावित असून जून 2023 अखेर सदर काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या महत्वाकांक्षी विशेष अभियानाव्यतिरिक्त इतर योजना व प्रकल्प पुढीलप्रमाणे.
1) मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना :
ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी अंदाजे 36 हजार गरोदर मातांची नोंदणी आरोग्य विभागांतर्गत केली जाते. त्यापैकी अंदाजे 10 हजार प्रसुती महापालिकेच्या प्रसुतीगृहे, रुग्णालयात होतात. या सर्व गरोदर मातांची नोंदणी बारा आठवड्याच्या आत करणे आवश्यक असून गर्भधारणेच्या काळात आवश्यक तपासण्या व उपचार देणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गर्भधारणेची नोंदणी वेळेत झाल्यास त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर योग्य उपचार करून गर्भधारणेचे निष्पत्ती एक सुदृढ माता व सुदृढ बालक अशी होणे निश्चित होते. गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्याकरिता डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेऊन योग्य ते फॉलोअप घेणे आवश्यक असते. परंतु अनेकदा गर्भवती महिलेची नोंदणी वेळेत होत नसल्याने त्यांच्या महत्त्वपूर्ण तपासण्या राहून जातात अशा वेळेस महिलेस प्रसुतीदरम्यान गुंतागुंत होऊन बाळ व आई दोघांच्याही जीवाला धोका संभवतो. यामध्ये प्रामुख्याने प्रसुतीपुर्व रक्तस्त्राव (APH) उच्च रक्तदाब (PIH), प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव (PPH) , कमी वजनाचे बाळ (Pre maturity) इत्यादी गुंतागुंतीच्या समस्या उद्भवतात.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातील स्थलांतरित नागरिक वास्तव्यास आहेत. अशा स्थलांतरित गरोदर मातांची माहिती मिळणे त्यांची नोंदणी करणे त्यांना आवश्यक औषधोपचार करणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. स्थलांतरित गर्भवती महिलांमध्ये घरी प्रसुती होणे तसेच माता मृत्यू, बालमृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. राज्यातील सर्व गरोदर मातांना सुरक्षित मातृत्व उपलब्ध व्हावे यासाठी मा.मुख्यमंत्री स्वत: आग्रही असून त्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. या भुमिकेशी संलग्न राहून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात "मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना " राबविण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेतील ठळक बाबी पुढीलप्रमाणे.
आशा स्वयंसेविका यांना अतिरिक्त मानधन :
गर्भधारणेची माहिती घेऊन गरोदर मातेची 12 आठवडयाच्या आत नोंदणी केल्यास तसेच गरोदर मातेचे tracking करुन प्रसुतीची नोंद घेतल्यास , रक्तक्षय असणा-या गरोदर मातांना भेटी देवून त्यांची हिमोग्लोबीनची पातळी योग्य प्रमाणात राखल्यास व जोखमीच्या मातांना गरोदरपणातील आवश्यक सेवा देवून गर्भधारणेची निष्पती सुदृढ बालक व सुदृढ माता असल्यास या करीता कामावर आधारित अतिरिक्त मोबदला महापालिकेतर्फे आशा स्वयंसेविकांना देण्यात येईल. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे अंतर्गत रु. 3 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
ॲनोमली स्कॅन :
गर्भधारणेच्या दुस-या तिमाही मध्ये करण्यात येणा-या ॲनोमली स्कॅनची अतिरिक्त सेवा कोपरी प्रसुतीगृह येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, जेणेकरुन नोंदणी झालेल्या प्रत्येक गरोदर मातेस योग्य वेळी ॲनोमली स्कॅन करुन घेणे शक्य होईल.
सर्व प्रसुतीगृहांचे बळकटीकरण :
गरोदर मातेस प्रसुतीपूर्व प्रसुतीच्या सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व महापालिका प्रसुतीगृहांचे बळकटीकरण करुन तेथे 24 X 7 अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. याकरिता आवश्यक मनुष्यबळ उदा. स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, परिचारीका कंत्राटी पध्दतीने घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यक स्थापत्य कामे देखील करुन घेण्यात येणार आहेत. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रुग्णालये व दवाखाने दुरुस्ती अंतर्गत रु. 7 कोटी तरतूद प्रस्तावित असून मानधनावर वैदयकीय अधिकारी व कर्मचारी या लेखाशीर्षांतर्गत रु. 12 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
SNCU :
कोपरी प्रसुतीगृहाअंतर्गत 18 खाटांचे Special Newborn Care Unit तयार करुन ज्या नवजात शिशूंचे जन्मत: वजन कमी आहे किंवा ज्या नवजात शिशूंना उपचारांची आवश्यकता आहे त्यांचेवर SNCU द्वारे आवश्यक उपचार करण्यात येतील. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील NICU ची क्षमता 50 पर्यंत वाढविणेचे प्रस्तावित आहे.
पोषण आहार :
जोखमीच्या गरोदर मातांना पोषण आहारासाठी गर्भधारणेच्या सहा महिने कालावधीसाठी DBT द्वारे अनुदान देण्यात येईल. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात सुदृढ मातृत्व योजनेंतर्गत रु. 3 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
मातृत्व भेट :
प्रसुतीपश्चात माता व नवजात शिशूस मातृत्व भेट म्हणून एक किट देण्यात येईल. ज्यामध्ये नवजात शिशू व गरोदर मातेसाठी प्रसुतीपश्चात उपयुक्त ठरणा-या बाबींचा समावेश असेल. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात सुदृढ मातृत्व योजनेंतर्गत रु. 3 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
Maternal Call Centre :
गरोदर माता व बालके यांना देण्यात येणा-या नियमित सेवा उदा. ANC चेकअप, लसीकरण, संस्थांत्मक प्रसुती इत्यादी बाबींचा पाठपुरावा करणे तसेच प्रत्येक गरोदर माता व 6 महिने वयोगटातील बालके यांना देणे अपेक्षित असणारी प्रत्येक सुविधा दिली जाईल हे निश्चित करण्यासाठी मॅटरनल कॉल सेंटर सुरु करण्यात येईल.
2) पार्कींग प्लाझा येथे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल :
पार्किंग प्लाझा येथे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याकरिता ठामपाचे 1100 खाटांचे डीसीएच सुरु केले होते व त्यासाठी मोठया प्रमाणात पायाभुत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. सदरचे ठिकाण हे शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांसाठी वैदयकीय दृष्टया अत्यंत सोईचे आहे. पार्कींग प्लाझा या ठिकाणी निर्माण झालेल्या पायाभुत सुविधांचा पर्याप्त वापर होण्यासाठी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी डिटेल प्लॅन व आर्किटेक्चरल डिझाईन बनविण्याचे काम सुरु असून त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
3) माझी आरोग्य सखी
माझी आरोग्य सखी या उपक्रमांतर्गत सर्व वयोगटातील महिलांकरिता Comprehensive health package व महिला सक्षमीकरणाकरिता महापालिकेच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे.
यासाठी ठाणे महापालिकेकडे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या मॅमोग्राफी व्हॅनमध्ये आवश्यक बदल करुन मॅमोग्राफी सोबत महिलांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निराकरण करणेसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक असणाऱ्या तपासण्या उदा. पॅपस्मिअर तपासणी, रक्त व लघवी तपासणी, बी.पी, शुगर, इसीजी, इ. तपासण्या व उपचार त्यांच्या घराजवळ शिबीरांद्वारे मोफत उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच महिलांच्या सामाजिक व आर्थिक सबळीकरणाच्या दृष्टीकोनातून केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येईल. याकरिता आवश्यक मनुष्यबळ उदा. स्त्रीरोग तज्ञ व परिचारिका कंत्राटी पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या मॅमोग्राफी व्हॅन व्यतिरिक्त अतिरिक्त मॅमोग्राफी व्हॅन सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करुन घेणे प्रस्तावित आहे.
4) वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना :
महापालिका हद्दीत एकूण 42 ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु आहेत. विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपाय योजना उदाहरणार्थ गरोदर माता नोंदणी, क्षयरोग तपासणी , उच्च रक्तदाब व मधुमेह स्क्रिनिंग इत्यादी आपला दवाखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.10 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
5) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अदययावतीकरण :
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील रुग्णसेवा सुधारणेसाठी रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या वॉर्ड मधील वापर क्षमता (Occupancy) 100% पेक्षा जास्त आहे अशा वॉर्डमध्ये बेडची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे नियोजित आहे. टप्प्याटप्प्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता 500 बेड वरुन 1000 बेड पर्यंत वाढविणे नियोजित आहे. रुग्णालयाची स्वच्छता सर्वोत्तम दर्जाची असावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यासाठी मनुष्यबळाद्वारे व यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
6) महापालिका क्षेत्रात CBSE शाळा सुरु करणे :
ठाणे महानगरपालिकेमार्फत CBSE शाळा सुरु करणे नियोजित आहे. CBSE हे राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड असून सदया ठाणे शहरात CBSE बोर्ड मधून शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्याने फक्त खाजगी शाळांचा पर्याय उपलब्ध आहे. CBSE अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी असून त्या माध्यमातून मुलांचा बौध्दिक विकास प्रभावीपणे होणे शक्य होते. मुलांच्या भविष्यातील प्रगतीचा विचार करता भविष्यवेधी शिक्षण देणे शक्य होईल. प्रत्येक पालकाला मुलांना चांगले शिक्षण दयावयाचे असते. मात्र सर्वसामान्य पालकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना CBSE शाळेमध्ये प्रवेश घेणे शक्य होत नाही. CBSE अभ्यासक्रमाच्या शाळा महापालिकेने सुरु केल्यास महापालिका शाळा चालवत असल्याने मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ होईल.
7) इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरु करणे :
सद्यस्थितीत महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या 7 शाळा आहेत. सद्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकता यावे याकरीता पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेणे पसंत करतात. मात्र जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर फक्त खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणे क्रमप्राप्त ठरते. सदर बाब सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिकदृष्टया परवडणारी नसते. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या नवीन शाळा सुरु करणे प्रस्तावित आहे.
8) मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण :
इंग्रजी शाळा सुरु करत असताना मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. सद्या मराठी शाळा बंद होत असल्याचे चित्र आहे. मात्र ज्या मराठी शाळा महापालिका चालवित आहे तेथील विदयार्थ्यांची पटसंख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याकरीता शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. शाळा इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येणार आहे. बालस्नेही (चाईल्ड फ्रेंडली) क्लासरुम तयार करण्यात येतील. प्रत्येक वर्गखोली स्मार्ट क्लासरुम (डिजीटल) बनविणे करीता प्राधान्य देण्यात येईल. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना बसण्याकरीता प्रोत्साहन देऊन त्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. आवश्यक ते शैक्षणिक साहित्य विदयार्थ्यांना पुरविण्यात येईल. शाळा दुरुस्ती करतांना मुलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असून त्यामध्ये कोणत्याही शाळेत गळती असू नये व शौचालय उत्तम दर्जाचे असेल याबाबत दक्षता घेतली जाईल.
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विदयार्थ्यांच्या विविध योजनांसाठी रु.32 कोटी, महापालिका शाळा मजबुतीकरणासाठी रु. 8 कोटी व शाळा बांधकामासाठी रु. 4 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
9) अमृत योजना -2 पाणी पुरवठा व्यवस्था :
अमृत योजना – 2 अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेसाठी रु.323 कोटी 72 लक्षची योजना शासन निर्णय दि. 3 मार्च 2023 नुसार मंजूर असून यामध्ये राज्य शासन 25% ,केंद्र शासन 25% व महापालिका 50% असा सहभाग आहे. या अंतर्गत 14 जलकुंभ, 85 कि.मी. लांबीची जलवाहिनी वितरण व्यवस्था , 1 एम.बी.आर. (10 द.ल.लि.) व 4 ठिकाणच्या पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याच्या कामाचा अंतर्भाव आहे. यामध्ये 18,255 हाऊस कनेक्शन देवून 1,14,248 कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.100 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
10) दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था :
पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे (रीमोडेलिंग) व नव्याने जलकुंभ बांधणेसाठी रु.240 कोटी 29 लक्ष अनुदान मंजूर झाले असून यामध्ये 105 कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकणेचे काम तसेच नव्याने एकूण 17 जलकुंभ बांधणेचे काम प्रस्तावित आहे. या योजनेमुळे दिवा व मुंब्रा प्रभाग समितीमधील पाणी पुरवठयाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.50 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
11) पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा :
पाणी पुरवठा व्यवस्था विस्तार व मजबुतीकरण यामध्ये 12 जलकुंभाचे काम सुरु असून 10 जलकुंभ पूर्ण झाले आहेत. 45.50 कि.मी. लांबीच्या वितरण (Distribution) व्यवस्थेची व 12 कि.मी. ची वहन वाहिनींची (Transmission) कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.25 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
12) मलनि:सारण योजना :
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे.एन.एन.यु.आर.एम अंतर्गत 3 टप्प्यात राबविण्यात आलेली योजना सन 2019 मध्ये पूर्ण करण्यात आली असून, अमृत अभियानांतर्गतची भुयारी गटार योजना मे 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भुयारी गटार योजना टप्पा क्र. 1, 2 व 3 अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था पूर्ण झालेल्या भागातील सुमारे 7,610 हाऊस कनेक्शनची कामे पूर्ण झालेली असून, उर्वरित कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अमृत अभियानांतर्गत घोडबंदर रोड परिसरात भुयारी गटार योजना टप्पा क्र. 4 मधील 99% कामे पूर्ण झाली असून, या योजनेअंतर्गत 61.22 कि.मी. लांबीची मलवाहिनी, 5 मलउदंचन केंद्र, हिरानंदानी पातलीपाडा येथे 59 द.ल.लि. क्षमतेचे व नागलाबंदर येथे 7 द.ल.लि. क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे सदर योजनेअंतर्गत सुमारे 728 हाऊस कनेक्शन (22,480 सदनिका) पैकी 558 हाऊस कनेक्शन (17,230 सदनिका) जोडण्यात आलेले असून, उर्वरित 170 हाऊस कनेक्शन मे 2023 पर्यंत जोडण्यात येतील. या सर्व कामांसाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात JNNURM अंतर्गत रु.9 कोटी, अमृत योजना फेज 1 साठी रु.9 कोटी, भुयारी गटार योजना टप्पा 5 साठी 8 कोटी व प्रभागात मलवाहिन्या टाकणे – हाऊस कनेक्शनसाठी रु.30 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
अमृत योजना -2 मलनि:सारण प्रकल्प :
ठाणे महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरातील मलनि:सारण वाहिन्या, पंपिंग स्टेशन, मलप्रक्रिया केंद्र इ. सह मलनि:सारण व्यवस्था दिवा प्रभाग समिती वगळता यापुवी हाती घेऊन पूर्ण केलेली आहे. दिवा प्रभाग समिती हद्दीमधील मलनि:सारण व्यवस्था अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. अमृत 2.0 योजनेअंतर्गत दिवा प्रभाग समिती हद्दीतील सर्व विभागासाठी मलनि:सारण व्यवस्था प्रकल्प हाऊस कनेक्शन व मलप्रक्रिया केंद्रासह हाती घेण्याचे नियोजन आहे.
13) झोपडपट्टी तिथे वाचनालय :
व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन ही मुलभूत गरज आहे. वाचनाचा संस्कार माणसाला चहुबाजुंनी विचार करण्यास प्रवृत्त करतो. वाचनाने माणसाचे आयुष्य समृद्ध होते. पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहे. वाचनामुळे अनेक नवीन गोष्टी ज्ञात होतात. अनेक विषयांची सखोल माहिती मिळते तसेच वैविध्यपूर्ण आणि समृद्ध शैली असलेल्या पुस्तकातून जगाची माहिती मिळण्यास मदत होते. तसेच चांगले वाचन हे लिखाणालाही प्रवृत्त करते. गोरगरीब नागरिकांना देखील वाचनाची आवड असूनही त्यांना पुस्तके विकत घेऊन वाचणे परवडत नाही. यासाठी ठाणे शहरातील झोपडपट्टी विभागात 'झोपडपट्टी तेथे वाचनालय' सुरू करण्याचे ठरविले आहे. झोपडपट्टी परिसरात एक जागा निश्चित करून त्या ठिकाणी नागरिकांना वाचायला आवडतील अशी विविध विषयांवरील पुस्तके तसेच वर्तमान पत्रे ठेवली जाणार आहेत, जेणेकरून झोपडपट्टी विभागात राहत असलेल्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना पुस्तके वाचायची सवय होईल व त्या माध्यमातून त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल हा या मागील हेतू आहे.
14) सी.डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे बळकटीकरण :
तज्ञांचे मार्गदर्शन:
ठाणे महानगरपालिका हद्दीतील विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्पर्धा परीक्षापूर्व तयारी (Foundation Batch) , पूर्व परीक्षा (Prelims Batch) आणि मुख्य परीक्षा (Mains Batch) यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे मिळावे याचे नियोजन करण्यात आले आहे. विदयार्थ्यांच्या मुलाखतीकरीता, प्रतिरुप मुलाखतीकरीता (Mock Interview) करीता ठाणे, मुंबई, पुणे व दिल्ली येथून तज्ञ मार्गदर्शकांना बोलविण्यात येते. यासाठी रु.20 लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.
इमारत दुरुस्ती :
प्रशासकीय संस्थेच्या इमारतीमध्ये नवीन लेक्चर हॉल, लायब्ररी, अभ्यासिका, ओपन जिम, बॅडमिंटन कोर्ट, ,क्युबिकल अभ्यासिका तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. यासाठी रु. 50 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
विदया वेतन :
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्गातील एकूण 70 प्रशिक्षणार्थी आणि राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) महाराष्ट्र शासन यांचेकडून दरवर्षी मार्गदर्शनाकरीता येणारे एकूण 70 प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह विदयावेतन देण्याचे प्रयोजन आहे. यासाठी अंदाजपत्रकात रु.30 लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
15) वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना :
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रस्तावित कामे पुढीलप्रमाणे.
कोस्टल रोड :
घोडबंदर रोडवरील वाहतुक शहराच्या बाहेरून वळविण्यासाठी खारेगाव टोलनाका ते कोलशेत ते घोडबंदर असा खाडी किना-याला लागुन बाळकुम गायमुख विकास आराखडयातील 40 मी. / 45 मी. रुंद आणि 13.215 कि.मी. लांबीचा कोस्टल रोड एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून विकसित करण्याचे ठाणे महापालिकेचे नियोजन आहे. सदर प्रकरणी रु. 1316.18 कोटी इतक्या अंदाज खर्चास एम.एम.आर.डी.ए. यांचेकडील ठराव क्र. 1563 दि.16.11.2021 अन्वये मंजुरी मिळाली आहे. सदरचा रस्ता कांदळवन भागात 3+3 मार्गिकेचा उन्नत मार्ग आणि उर्वरीत भागात 4+4 मार्गिकेचा जमीनीवर असणार आहे. सदरचा रस्ता संपूर्ण सिमेंट कॉक्रिट पध्दतीने बांधण्यात येणार आहे. सदर प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करणे, सर्व शासकीय तसेच केंद्रीय वन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालय आणि एम. सी. झेड. एम.ए. च्या परवानग्या ठाणे महानगरपालिका घेणार असून सदर प्रकल्पाची अंमलबाजवणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत होणार आहे.
तीन हात नाका ग्रेड सेपरेटर :
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील तीन हात नाका येथे सर्वाधिक वाहतुक कोंडी असते. या ठिकाणी पूर्व द्रुतगती महामार्ग, चार सेवा रस्ते, एलबीएस मार्ग, गोखलेमार्ग हे रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी सर्वाधिक वाहतुक असल्याने या ठिकाणी ग्रेड सेपरेटर करणे आवश्यक असून ग्रेड सेपरेटर करण्याचे काम एम.एम.आर.डी.ए. मार्फत करण्यात येणार आहे.
घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वे चा विस्तार:-
सद्यस्थितीत इर्स्टन फ्री वे घाटकोपर येथे संपतो तदनंतर नाशिक, घोडबंदर कडे येणारी वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरुन ठाणे तीन हात नाका मार्गे इच्छीत स्थळी जातात व त्यामुळे ठाणे शहरामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. सदरची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून फ्री वे चा विस्तार कोपरी टोलनाका - कन्हैयानगर - साकेत - कोस्टल रोड असा 2+2 मार्गिकेचा 14 कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग असणार आहे. सदर प्रकरणी रु. 2,900 कोटी इतक्या अंदाजखर्चास एम.एम.आर.डी.ए. मार्फत मंजुरी मिळाली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबाजवणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत होणार आहे.
आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग :-
ठाणे शहरामध्ये आनंदनगर ते साकेत दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्याच्या रु. 1275 कोटी इतक्या खर्चास एम.एम.आर.डी.ए. ने मंजुरी दिलेली आहे. सदर रस्त्याची लांबी 6.3 कि.मी. असून, सदरचा उन्नत मार्ग 3+3 मार्गिकेचा असणार आहे. सदर प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईकडून बाहेर जाण्या-या वाहतुकीला ठाणे शहरात पूर्व द्रुतगती मार्गावर न उतरता परस्पर बाहेर जाणे सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वाहतुक व बाहेरील वाहतुकीमुळे ठाणे शहरातील कोंडी कमी होऊन प्रदुषणामध्ये घट होणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत होणार आहे.
ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे :
ठाणे शहर व कोपरी येथील रहिवाशांना वागळे इस्टेट परिसरात जाणेसाठी तीन हात नाका येथून जावे लागते मात्र तीन हात नाका येथे जास्तीची वाहतूक असल्याने वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवासासाठी जास्तीचा वेळ लागतो. ठाणे शहर व कोपरी येथील नागरीकांना वागळे इस्टेट येथे जाणेसाठी पर्यायी मार्गाचा विचार करता कोपरी पूलासोबत सब-वे चे काम पूर्ण झाले असून सब-वे च्या वागळे इस्टेट कडील जोड रस्त्याचे काम एम.एम.आर.डी.ए. मार्फत सुरु आहे. सदरचे काम मे 2023 अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे शहर व कोपरी येथील नागरीकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल व वाहतूक वेळेत बचत होईल. महापालिका क्षेत्रामधुन जाणा-या इतर शासकीय संस्थांच्या मालकीचे रस्ते पावसाच्या कालावधीत नादुरुस्त होऊन खड्डे पडल्याने या रस्त्यांवर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारक शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करीत असल्यामुळे शहरामधील रस्त्यावरील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती. यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे.
तीन हात नाका ते मॉडेला चेक नाका या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणेचे नियोजन आहे. महापालिका हद्दीतील कापूरबावडी ते बाळकुम या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका हद्दीमधील मेट्रो 4 व 4 A चे काम ज्या ठिकाणी पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी रस्ते सुस्थितीत राखून वाहतूक कोंडी होवू नये याकरीता उपाय योजना करण्यात येत आहेत.
दिवा डोंबिवली कल्याण रस्त्यावरील मोठे गृहनिर्माण प्रकल्प जसे पलावा येथील पुलाचे काम तातडीने पूर्ण करुन वाहतूक कोंडी कमी करण्याचे नियोजन तसेच या भागातील महानगरपालिका हद्दीतील रस्ते व मुंब्रा ROB सुस्थितीत राखण्याचे नियोजन आहे. तसेच ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करुन वाहतूक नियमन करणेसाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु. 3 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
16) पार्किंग व्यवस्था :
शहरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध होणे आवश्यक आहे. जेणेकरुन रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याचे प्रमाण कमी होईल व त्यामुळे रस्त्याची रुंदी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपयोगी होईल. यासाठी संपूर्ण शहरात पार्किंगसाठी आरक्षित भूखंड तसेच शहर विकास विभागामार्फत उपलब्ध झालेले सुविधा भूखंड महापालिकेच्या माध्यमातून स्वत: किंवा खाजगी भागीदारी तत्वावर (PPP) विकसित करणे प्रस्तावित आहे. वागळे इस्टेट मध्ये एम.आय.डी.सी.च्या प्लॉटवर 7 मजल्याचे बहुमजली पार्किंग निविदा स्तरावर असून त्या व्यतिरिक्त नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत तहसील कार्यालय येथे बेसमेंट पार्किंग, शाहू मार्केट, गडकरी रंगायतन जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जागा, पोखरण रोड नं.1 या रस्त्यावरील आरक्षित भूखंड अशा ठिकाणी बहुमजली पार्किंग सुविधा विकसित करण्याचे नियोजित आहे.
17) क्लस्टर योजना :
ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महानगरपालिकेने एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे (एकुण क्षेत्र 1508 हेक्टर) अधिसुचित केले आहेत. त्यापैकी यु.आर.पी. क्र. 1 कोपरी, यु.आर.पी. क्र.3 राबोडी, यु.आर.पी. क्र.6 टेकडी बंगला, यु.आर.पी. क्र. 11 हाजुरी, यु. आर. पी. क्र. 12- किसन नगर, यु. आर. पी. क्र. 13 लोकमान्यनगर एकुण 294.48 हेक्टर एवढ्या क्षेत्रफळाचे 6 नागरी पुनरुत्थान आराखडे प्राधान्याने राबविण्याचा निर्णय मा.सर्वसाधारण सभेने घेतला आहे. या सहा नागरी पुनरुत्थान आराखडयामध्ये सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे.
त्या अनुषंगाने वरील आराखड्यासह स्मार्ट सिटी अंतर्गत समाविष्ट यु.आर.पी. क्र.10 - स्टेशन 500.00 मी., यु.आर.पी. क्र.07 - महागिरी, यु.आर.पी. क्र.04 - आझादनगर, यु.आर.पी. क्र.41 - दिवा-1, यु.आर.पी. क्र.42 - दिवा-2 व यु.आर.पी. क्र.43 - साबे गांव या यु.आर.पी. मध्ये CIMS सर्व्हेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेला आहे.
ठाणे महानगरपालिकेमार्फत नागरी पुनरुत्थान योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता यु.आर.पी. लगतच्या 400 मीटर मधील शासकीय /निमशासकिय मालकीचे मोकळे भूखंड यु.आर.पी. मध्ये समाविष्ट करणेबाबतची कार्यवाही महापालिकेमार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत यु.आर.पी. क्र.12 - किसननगर मधील यु.आर.सी. क्र.01 व 02 क्षेत्र – 31.41 हेक्टरसाठीच्या अंमलबजावणीकरिता सिडकोची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. यु.आर.सी. क्र. 1 व 2 मध्ये पुनर्विकासाची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात रु.77 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
18) अंतर्गत मेट्रो :
ठाणे रेल्वे स्टेशनवरुन घोडबंदर भागामध्ये जाणा-या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ठाणे वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे. सदर कामाचा रु. 10,412. 61 कोटी इतक्या रक्कमेचा डी. पी. आर. मंजुर असुन सदर प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळण्यासाठी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे सादर केला आहे. या अंतर्गत मेट्रोची लांबी 29 कि.मी. असून, या पैकी ठाणे कॉलेज से ब्राम्हण सोसायटी ते मनोरुग्णालय या 3 कि.मी. भाग भुमीगत असणार आहे. उर्वरीत भाग उन्नत असणार आहे. या मार्गावर 22 स्थानके असून 2 स्थानके भुमीगत असणार आहेत. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वागळे इस्टेट, वसंत विहार, घोडबंदर हिरानंदानी इस्टेट,कोलशेत दादलानी पार्क या भागात जाण्यासाठी नागरिकांना मेट्रोची सुविधा मिळणार असून रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीमध्ये घट होईल. सदर प्रकल्पाची अंमलबाजवणी विशेष उद्देश वाहन (SPV) ची स्थापना करून केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याचे नियोजन आहे. राज्य शासन केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करुन अंतर्गत मेट्रो प्रकल्पास केंद्र शासनाची सत्वर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.
19) ठाणे मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक :
ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची 14.83 एकर जागा उपलब्ध होणेबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने दि.3 मार्च 2023 रोजी स्थगिती उठविलेली असून नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या स्थानकाच्या कामासाठी एकूण रु. 119.32 कोटी तसेच जोडरस्ते आणि Circulating Area विकसीत करणेसाठी रु. 143.70 कोटी असे एकूण रु. 263.02 कोटी इतका खर्च येणार आहे. हे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार असून नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक तयार झाल्यास ठाणे स्थानकावरील सुमारे 31% व मुलुंड स्थानकावरील 24% प्रवासी भार कमी होणार आहे. नवीन स्थानकाचा फायदा प्रामुख्याने वागळे इस्टेट, घोडबंदर रोड परिसरामधील नागरीकांना होणार आहे.
20) प्रदुषण मुक्त व धूळमुक्त ठाणे :
शहर पर्यावरणामध्ये सुधारणा :
15 वा वित्त आयोग अंतर्गत हवा गुणवत्ता सुधारणेकरिता प्राप्त अनुदानातून करण्यात येणारी कामे :
165 इलेक्ट्रीक बस खरेदी करणे :
123 इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याकरिता कार्यादेश देण्यात आलेला असून आगामी कालावधीमध्ये 42 वातानुकूलीत ई-बसेस खरेदी करण्यात येत आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 123 इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. सदर बसेस मुख्यत: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अधिकतम अंतर असणा-या मार्गिकांवर चालविण्यात येणार आहेत.
बाळकुम, माजिवडा व वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीमध्ये PNG गॅसवरील शवदाहिनी कार्यान्वित करणे :
स्मशानभूमीच्या नजीकच्या परिसरात राहणा-या नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणा-या तक्रारींच्या निवारणाकरिता व सार्वजनिक आरोग्य राखण्याकरिता ठाणे महानगरपालिकेद्वारे बाळकुम, माजिवडा व वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीमध्ये PNG गॅसवरील शवदाहिनी उभारण्याचे काम सुरु करण्यात आलेले असून वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीतील काम पूर्ण झालेले आहे.
धुळमुक्त ठाणे - मेकॅनिकल डस्ट स्विपींग मशिन :
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग (पुर्व द्रुतगती महामार्ग) व पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा घोडबंदर रोड व जुना मुंबई पुणे महामार्ग शहराच्या मध्य भागातून जातो. या रस्त्यांची सफाई तसेच शहरातील चार लेन असलेले रस्ते सफाई करणेकरीता मेकॅनिकल स्विपींगचे नियोजन करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्याकरिता 5 डस्ट स्विपींग मशीन खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. सदर प्रक्रियेसाठीचा लागणारा कालावधी लक्षात घेता तात्पुरती व्यवस्था म्हणून मर्यादीत कालावधीसाठी 2 मेकॅनिकल डस्ट स्विपिंग मशिन्स भाडेतत्वावर घेणे प्रस्तावित आहे.
सुका कचरा व्यवस्थापनाकरिता अद्ययावत मशिनरी खरेदी :
ठाणे महानगरपालिकेद्वारे कार्यान्वित असलेल्या सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे सक्षमीकरणाकरिता ठाणे महानगरपालिकेद्वारे अद्ययावत मशिनरींची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये मुख्यतः 06 बेलिंग मशिन, 06 प्लास्टिक श्रेडींग मशिन आणि इतर आवश्यक मशिनरींची खरेदी करण्यात येत आहे.
21) महिलांसाठी शौचालय :
सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी समर्पित (Dedicated) शौचालयांचे जाळे अधिक सक्षम करणे नियोजित असून विशेषत: मार्केट एरीयात नव्याने महिलांसाठी शौचालय निर्माण करणे नियोजित आहे.
22) धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना :
समाज विकास विभागांतर्गत महिलांच्या स्वयंरोजगारासाठी धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विधवा, घटस्फोटीत, गरीब व गरजू महिला, सर्वसाधारण महिला यांना स्वयंरोजगार निर्माण करुन त्यांचे सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्याचे दृष्टिकोनातून घरघंटी , शिवणयंत्र, मसाला कांडप मशीन या यंत्रसामुग्रीचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण कार्यक्रमांतर्गत आवश्यक तरतूद प्रस्तावित आहे.
23) महिला व बालकल्याण कार्यक्रमांतर्गत कल्याणकारी योजना :
कचरा वेचक महिलांच्या मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य
विधवा / घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य
मुली/महिला खेळाडूकरिता गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना शिष्यवृत्ती देणे
कोणत्याही कारणामुळे पतीचे / कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल / विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबविणे
मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे
पहिल्या मुलीनंतर शस्त्रक्रिया करणा-या अथवा पहिली मुलगी असतांना दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य करणे.
प्रभाग समिती स्तरावर समुपदेशन केंद्र सुरु करणे.
या सर्व योजनांसाठी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण कार्यक्रम या लेखाशीर्षांतर्गत रु. 33 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
24) दिव्यांग कल्याणकारी योजना :
कॉकलिअर शस्त्रक्रिया झाल्यावर बालकास स्पीच थेरेपीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सर्व दिव्यांगांची विशेष अज्ञावलीद्वारे नोंदणी करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात सर्व स्तरावरील दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने काही योजना प्रस्तावित करण्यात येत आहेत. यामध्ये दिव्यांग विदयार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार, कुष्ठरोग इत्यादी लाथार्थ्यांना अर्थसहाय्य देणे, तसेच दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करणेकरीता, दिव्यांगाना सहाय्यभूत साहित्य खरेदी करणे. वैदयकीय खर्चासाठी, लग्नासाठी अर्थसहाय्य करणे इत्यादीचा समावेश आहे. यासर्व बाबींसाठी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणकारी योजना या लेखाशीर्षांतर्गत रु. 14 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
25) तृतीय पंथीयांसाठी योजना :
तृतीय पंथीयांचे संबंधित विविध योजना राबविण्यासाठी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
26) फेरीवाला धोरण :
पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. ठाणे शहरात पात्र नोंदणीकृत फेरीवाल्यांचे सुनियोजितपणे नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत असून लवकरच पात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी फेरीवाला क्षेत्रात जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु असुन ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाले यांचे नियमितीकरण करण्यात येत आहे.
27) कला, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम :
गडकरी रंगायतन अद्ययावतीकरण :
गडकरी रंगायतन अद्ययावतीकरण करणेसाठी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात रु. 3 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह :
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहामध्ये IPL स्पर्धेतील संघांना सरावाकरीता MCA कडून मागणी आल्याने मैदान उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु फ्लड लाईट नसल्यामुळे IPL स्पर्धा ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आल्या नाहीत. यासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री यांच्या प्रयत्नाने शासनाकडून रु.23 कोटी अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून फ्लड लाईटस नव्याने बसविण्यात आल्या आहेत. तसेच प्रेक्षागॅलरीचे मजबुतीकरण व नुतनीकरण करण्यात आले आहे. तसेच चेजिंग रुमचे विस्तारीकरण करण्यात आले असून प्रेक्षागॅलरीत पत्रकारांकरीता 150 व्यक्तींकरीता मिडिया सेंटर बनविण्याचे काम सुरु आहे.
28) वृक्ष प्राधिकरण :
वृक्ष प्राधिकरण विभागाकडे यांत्रिकी पद्धतीने फांदया छाटणेसाठी 2 वाहने उपलब्ध असून अतिरिक्त 3 वाहने उपलब्ध करुन घेण्यासाठी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकात आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे.
29) परिवहन सेवा :
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेस सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रु.150 कोटी 10 लक्ष अनुदान मंजूर करण्यात आले होते. यामध्ये वाढ करुन सुधारित अंदाजपत्रकात रु. 174 कोटी 10 लक्ष अनुदानाची तरतूद करण्यात आली असून सन 2023-24 साठी रु. 230 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
30) प्रशासकीय कामकाजात सुधारणा
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना 7 वा वेतन आयोग डिसेंबर 2022 च्या वेतनातून लागू करण्यात आलेला आहे. यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिका अंतर्गतच्या सर्व आस्थापनामधील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने नोंदविणेकरिता येत्या आर्थिक वर्षामध्ये उपाययोजना करण्यात येणार आहे. सध्या सर्व विभागांचे संगणकीय कामकाज स्वतंत्रपणे होत आहे. सर्व विभागांना संगणक प्रणालीद्वारे एकत्रित जोडणे प्रस्तावित असून, याद्वारे विभागांतर्गत समन्वय सोईस्कर होणार आहे. या सर्व योजना, अभियान व प्रकल्पांसाठी सन 2023-24 मध्ये महसुली खर्च रु.2708 कोटी 83 लक्ष , भांडवली खर्च रु. 1660 कोटी 91 लक्ष , अखेरची शिल्लक रु. 26 लक्षसह एकूण रु.4370 कोटी खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात येत आहेत.