Thane Metro : मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ, 35 KM लांबी, ठाणेकरांचा प्रवास सुसज्ज करणारी मेट्रो कशी आहे, स्टेशन किती?
Thane Metro : ठाणे मेट्रो 4 आणि 4 अ या मार्गिकांची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Thane Metro : ठाणेकरांच्या बहुप्रतिक्षित मेट्रो (Thane Metro) प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आज टाकण्यात आलं. मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज झाला. या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आला. ज्यात नेतेमंडळींनी मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला. मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून, यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील दळणवळण अधिक सुलभ, वेगवान करणे हा आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मेट्रो नेमकी कशी आहे?
मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये
- BEML चे 6-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग 2 अ व 7 वर चालत आहेत त्याच पध्दती,
- आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम
- प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा
- स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली
- (Obstacle) अडथळा शोध उपकरण
- आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा
- ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली
- ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे 30 टक्के बचत)
ट्रायल रनमधील 10 स्थानके
कॅडबरी
माजीवाडा
कपूरबावडी
मानपाडा
टिकुजी-नी-वाडी
डोंगरी पाडा
विजय गार्डन
कासरवाडावली
गोवानिवाडा
गायमुख
एकूण 32 स्थानके असणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाणेकरांकरिता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी मेट्रोची आहे. मेट्रो चारची लांबी 32 किलोमीटर आणि चार अची लांबी 2.88 किलोमीटर आहे. एकूण 32 स्थानक यात आहेत. जवळपास 16 हजार कोटी रुपये या करिता खर्च करण्यात येत आहेत. दैनंदिन प्रवासी संख्या 13 लाख 43 हजार हा मार्ग सुरू झाल्यानंतर असेल, अशी अपेक्षा आहे. मोघरपाडा येथे डेपो करता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली असल्याने मेट्रो चार, मेट्रो चार अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्यांचा डेपो म्हणून त्या ठिकाणी मोठे काम होणार आहे. या मार्गीकेवरील मेट्रो आठ डब्यांची असणार आहे. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल. यात दररोज 21 लाख लोक प्रवास करू शकतील. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करेल की, हा टप्पा होण्याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले. मोघरपाड्याला जी डेपोची आवश्यकता होती, त्याकरता एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणी दूर केल्या. ती जमीन डेपो करता मिळवून दिली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील या डेपोत विशेष प्रयत्न केलेले आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले
प्रवास अधिक सोयीस्कर होणार
दरम्यान, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ही मेट्रो सुविधा नागरिकांसाठी कधी खुली होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
GST tax Change: जीएसटी करात आजपासून बदल, कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग? वाचा ए टू झेड यादी
























