(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एका रात्रीत 18 चिमुकले दगावले, मात्र कोणावरच ठपका नाही? कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर
Thane News: गेल्या आठवड्यात शुक्रवारी चौकशी समितीनं आपला अहवाल शासनाला सादर केल्याची माहिती मिळतेय. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी केवळ ठाण्यातंच नव्हे तर राज्याच्याच आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं.
Thane News Updates: ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) एकच दिवशी झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीनं (Inquiry Committee) अखेर आपला अहवाल सादर केला आहे. शुक्रवारी समितीनं अहवाल शासनाला सादर केला आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापलं असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचं तांडव होऊन एकावरही दोषारोप ठेवण्यात आला नसल्यानं चौकशी समितीच्या चौकशीवरच आश्चर्य आता व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमली होती. ही घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी चौकशी समिती आपला अहवाल सादर करेल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. मात्र हा अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला बराच विलंब लागला. या समितीची पहिली बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाल्यानंतर इतर सर्व बैठका या कळवा रुग्णालयात झाल्या. या प्रकरणाची चौकशी करत असताना रुग्णालयातील महत्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यापासून ते डॉक्टर्स, नर्स, मृतांचे नातेवाईक अशा सर्वांचे जबाब समितीच्या वतीनं नोंदवण्यात आले. दोन वेळा मुदत उलटूनही समितीनं अहवाल सादर केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच अहवाल सादर केला नाही तर पालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा कळवा रुग्णालयात जाऊन काँग्रेसच्या ठाण्यातील शिष्टमंडळानं दिला होता.
अखेर गेल्या आठवड्यात शुक्रवारी चौकशी समितीनं आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी केवळ ठाण्यातंच नव्हे तर राज्याच्याच आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. ठाण्यातीलच नव्हे तर राज्याच्या विरोधी पक्षानं या प्रकरणावरून रान उठवलं होतं. बराच काळ ही चौकशी सुरू असल्यानं कोणावर तरी कारवाई होईल, अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नसून या अहवालात सध्या तरी कोणावर दोषारोप ठेवण्यात आले नसल्यानं आता विरोधी पक्ष यावरून काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं आहे.
रुग्णालयाच्या त्रुटींबाबत वेधलं लक्ष...
अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आला नसला तरी रुग्णालयांच्या त्रुटींबाबत मात्र या चौकशी समितीनं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. रुग्णालायाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत? याबाबत कोणी बोलायला तयार नाही. चौकशी समितीनं सुचवलेल्या सुधारणांबाबत तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार का? याबाबतही साशंकता आहे.
चौकशी समितीचा घटनाक्रम
- घडलेल्या घटनेचा घटनाक्रम निश्चित तपासला
- रुगणलायात 10 तासांत 18 रुग्ण दगवल्यानं रुग्णालयातील आयसीयूमधील आणि जनरल वॉर्डमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेत काय कार्यवाही केली, याचा आढावा घेतला
- रुग्णालयातील घडलेल्या घटनेची कारणमीमांसा आणि आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीनं तपासणी
- रुग्णालयातील सर्व यंत्रणेची वस्तुस्थिती तपासली
- डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, मृतांचे नातेवाईक यांचे जबाब नोंदवले
- अशा प्रकारच्या घटना पुन्हा भविष्यात घडू नये यासाठी कार्यवाही