ठाणे शहराला भातसा आणि बारवी धरणातून अतिरिक्त पाणी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
Thane Municipal Corporation : भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी ठाणे शहराला देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : ठाणे (Thane) शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी ठाणे शहराला देण्यात येणार आहे. तर कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर आणि दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याच्या सूचना आज मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ठाणे महापालिका क्षेत्रात रोज 485 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला 100 दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तत्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेसह कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश देले आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुर्या धरणातून 218 दशलक्ष लिटर पाणी साठा करण्याबाबत एमएमआरडीएने तत्काळ कार्यवाही करावी, तसेच उल्हासनगर महापालिकेचा देखील पाणी प्रश्न सोडविण्याठी एमआयडीसीने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणा 24 तास सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश