Pradeep Purnekar : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, सीबीआयकडे मागणी करणार, अमित शाहांना भेटणार: नरेश म्हस्के
Pradeep Purnekar Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना सीबीआयने अटक करावी यासाठी आम्ही मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एकनाथ शिंदे हे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. त्यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव दिशा सालियन प्रकरणात आरोपी म्हणून आहे. त्यांना अटक करा अशी मागणी आपण सीबीआयकडे करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच या प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही म्हस्के म्हणाले.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांना अटक करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच एकनाथ शिंदे हे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही अधिकार आदित्य ठाकरे यांना नाही. आदित्य ठाकरे यांचे नाव दिशा सालियन प्रकरणात आरोपी म्हणून आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांनी तसे आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही त्यांचे नाव आहे. ठाण्यात ऑटोमोबाईलचे दुकान असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणाशी त्यांचा संबंध आहे. असं असताना शिंदेंचे नाव त्यांनी घेऊ नये."
आदित्य ठाकरे यांना सीबीआयने अटक करावी यासाठी शिवसेना मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे यांना अटक करावी यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊ, असंही म्हस्के म्हणाले.
ठाण्यात तणावाचं वातावरण
प्रदीप पूर्णेकर हत्येला एक महिना पूर्ण झाल्यावर आज ठाण्यात तणावाचं वातावरण आहे. आदित्य ठाकरेंनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांशी तपासासंदर्भात चर्चा केली. त्याआधी त्यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेटही घेतली. दुसरीकडे आनंद आश्रम इथे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अटक करा अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली.
मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी सातत्यानं पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे सेनेच्या निशाण्यावर असणाऱ्या मीनाक्षी शिंदेंनी शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदेंनी दिलं. आपला संबंध नसलेल्या काही प्रकरणांमध्ये नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पत्रात केला. मीनाक्षी शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ही बातमी वाचा:






















