दिवस चांगला जाण्यासाठी घरात मुंगूस पाळले; वनविभागाने दिला कारवाईचा दणका
Mongoose : मुंगूस पाहिल्यास दिवस चांगला जात असल्याच्या समजेतून एकाने घरात चार मुंगूस पाळले असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने मुंगूस पाळणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.
Mongoose : आजपर्यंत कासव शुभ असल्याचा समज असल्याने अनेकांनी घरात कासव पाळल्याचं अनेकदा ऐकलं असेल. स्टार प्रजातीचे कासव पाळणे गुन्हा आहे. स्टार प्रजातीचे कासव पाळल्याने अनेकदा कारवाई देखील झाली आहे. आता, तुम्ही घरात शुभ कारणांसाठी मुंगूस प्राणी पाळत असाल तर सावध व्हा, वनविभागाकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. नुकतीच ही घटना समोर आली आहे.
मुंगूस हा शुभ प्राणी मानला जातो. मुगुंस दिसल्यास दिवस शुभ जातो धनप्राप्ती होते अशी अंधश्रध्दा आहे. याच अंधश्रद्धेतून डोंबिवलीत एकाने चक्क घरातच पिंजऱ्यात चार मुंगूस पाळल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्यातून चार मुंगुसांची सुटका केली. या प्रकरणी मुंगूस पाळणाऱ्यांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडिल शास्त्री नगर जुनी डोंबिवली परिसरात गणेश स्मृती येथे विठ्ठल जोशी आपल्या कुटुंबासह राहतात .मुंगूसचा चेहरा रोज बघितल्यावर दिवस चांगला जातो व धनप्राप्ती होते असा विठ्ठल जोशी यांचा समज होता. याच खोट्या समजातून त्यांनी चक्क मुंगूस पाळण्याचा निर्णय घेतला. चक्क एका जंगलातून चार मुंगूस पकडुन आणून घरात ठेवले. हे चारही मुंगूस एका पिंजर्यात ठेवण्यात आले होते. याबाबत कल्याण वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाली.
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्याअंतर्गत मुंगूस पाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे. वनविभागाच्या पथकाने तात्काळ विठ्ठल जोशी यांच्या घरी छापा मारत पिंजऱ्यात बंद असलेले हे चार हे मुंगूस ताब्यात घेतले. या प्रकरणी वन विभागाने विठ्ठल जोशी यांच्या विरोधात कारवाई केली . कायद्याने बंदी असलेले वन्यजीव प्राणी पाळू नये असं आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.