Bhiwandi Rains : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तिघींवर वीज कोसळली, दोन तरुणींचा जागीच मृत्यू एक महिला जखमी
Bhiwandi Rains : शेतात खेकडे पडकण्यासाठी गेलेल्या दोन तरुणी आणि एक महिला यांच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर त्यांच्यासोबतची महिला गंभीर जखमी झाली आहे.
Bhiwandi Rains : राज्यात सर्वदूर परतीच्या पावसाना धुमाकूळ घातला आहे. बहुतांश जिल्ह्यात परतीचा पावसाने धुडगूस घातला आहे. एकीकडे या पावसामुळे पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे वीज कोसळून (Lightning Strike) मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. अशीच घटना भिवंडीमध्ये (Bhiwandi) घडली आहे. शेतात खेकडे (Crab) पडकण्यासाठी गेलेल्या दोन तरुणी आणि एक महिला यांच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर त्यांच्यासोबतची महिला गंभीर जखमी झाली आहे. भिवंडी तालुक्यातील पिसा-चिराड पाडा गावाच्या हद्दीत शुक्रवारी (14 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. जखमी महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शितल अंकुश वाघे (वय 17 वर्षे) आणि योगिता दिनेश वाघे (वय 20 वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणीची नावे आहेत. तर सुगंधा अंकुश वाघे (वय 40 वर्षे) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे.
खेकडे पकडण्यासाठी शेतात गेल्या आणि वीज कोसळून दुर्दैवी अंत झाला
परतीच्या पावसाने भिवंडी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. यावेळी शीतल आणि तिची आई सुगंधा या दोघी मायलेकी योगिता वाघेसोबत शेतात खेकडे पकडण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. ज्यात शितल आणि योगिता या दोन तरुणींचा मृत्यू झाला तर सुगंधा वाघे या गंभीर जखमी झाल्या. वीज कोसळल्यानंतर तासभर मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पाड्यावरील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. या घटनेचे माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणीचे मृतदेह पडघा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले. तर जखमी महिलेला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले.
कोकणातही वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
दरम्यान कोकणातही काही दिवसांपूर्वी अंगावर वीज कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कोकणा विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही 11 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी वीज अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.