(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan : एपीएमसी मार्केटमधील फूल मार्केट जमीनदोस्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाची कारवाई
Kalyan APMC Market : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणमधील एपीएमसी मार्केटमधील फूल मार्केट जमीनदोस्त करण्यात आले आहे.
Kalyan APMC Market : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणमधील एपीएमसी मार्केटमधील (APMC Market) फूल मार्केट जमीनदोस्त करण्यात आले आहे. प्रशासाच्या या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. कारवाई करा मात्र आमच्या पुनर्वसनाचं काय? असा सवाल त्रस्त फूल विक्रेत्यांनी प्रशासनास उपस्थित केला. या फुल विक्रेत्यांचे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येईल, असं आश्वासन एपीएमसी (APMC Market) प्रशासनाने दिले आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील फूल मार्केटमधील शेड तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार आज पोलिस (police) बंदोबस्तात एपीएमसी (APMC Market) प्रशासनाने फुल मार्केटची शेड पाडण्याची कारवाई केली. या कारवाईस फूल विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. मात्र पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या फुल विक्रेत्यांचे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येईल असा आश्वासन एपीएमसी प्रशासनाने दिले आहे. तसेच या जागी नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये नियमानुसार फुल विक्रेत्यांना जागा दिली जाईल, असे देखील स्पष्ट केले. कल्याणमधील एपीएमसी मार्केट (APMC Market) मधील फूल मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या पूनर्विकासाला काही फूल विक्रेत्यांचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश एपीएमसी दिले होते. सात दिवसात ही कारवाई करा असे आदेश केले होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर महापालिकेने त्याठिकाणी विक्रेत्यांना नोटिसा बजावून आज कारवाई केली जाईल, असे सूचित केले होते. आज कारवाईकरीता एपीएमसीचे पथक पोहचले होते. प्रशासनाच्या कारवाईला फूल विक्रेत्यांनी विरोध केला.
काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कारवाई करा मात्र आमच्या उदरनिर्वाहाचं काय? असा सवाल फुल विक्रेत्यांनी उपस्थित केला. आधी आमचं पुनर्वसन करा, त्यानंतर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी एपीएमसी प्रशासनाने या फुल विक्रेत्यांचं पुनर्वसन एपीएमसी मार्केटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या जागेवर करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच या जागेवर नव्याने इमारत बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी या फुलविक्रेतांना पुन्हा ओटे देण्यात येतील, असे देखील आश्वासन दिलं आहे.
शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी केडीएमसीने (KDMC) केलेल्या कारवाईचा निषेध आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. ज्या जागेवर फूल विक्रेत्यांचे शेड होते. ती जागा केडीएमसीला दिली आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्यात धोकादायक शेड पाडण्याचे म्हटले आहे. मात्र क प्रभाग अधिकारयांनी 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार शेड धोकादायक नसताना सत्तेच्या जोरावरही कारवाई केली, असेही सचिन बासरे म्हणाले.