Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ 'खड्ड्यात'; ठाण्याला 605 कोटींचा निधी मिळूनही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास
Thane Potholes : एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही ठाण्यातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे: गेल्या तीन दिवसापासून ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज रेड अलर्ट देखील जाहीर केलेला आहे. या संततधारेमुळे शहरात पाणी तुंबण्याच्या ठिकाणामध्ये दरवर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी शहरातील वागळे इस्टेट एम.आय.डीसी परिसरातील रस्त्यांवर मात्र मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ खड्ड्यात (Thane Potholes News) गेल्याचं चित्र या पावसात दिसून येतंय.
औद्योगिक वसाहत असलेल्या या भागात हजारो चाकरमानी नोकरी धंद्यानिमित येत असतात, त्यांना या खड्ड्यांचा मनस्ताप सोसावा लागत आहे. दरम्यान सरकारने ठाणे महापालिकेला रस्ते उभारणीसाठी 605 कोटी देऊनही नागरिकांच्या नशिबी खड्डयातून मार्गक्रमण करणे आल्याची चर्चा रंगली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत समजल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातील दळणवळणाची वाट बिकट बनली आहे. वागळे इस्टेट एम.आय.डीसी हा इंडस्ट्रियल एरिया असून रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. इथे उद्योग व्यवसायाशी निगडीत वाहतुकीसोबतच इथे काम करणाऱ्या कामगारांनांही या रस्त्यावरून ये जा करावी लागते. मात्र येथील रस्त्यावर अगणित खड्डे पडल्याने याचा त्रास सर्वानाच सहन करावा लागत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांसाठी 605 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यातून संपूर्ण शहरात 283 रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 127 तर, दुसऱ्या टप्प्यात 156 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. तरीही वागळे इस्टेट भागातील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या परिसरात राहणारे नागरिक असतील किंवा इंडस्ट्रीज भाग म्हणजे मालक, चालक आणि काम करणारे लेबर असतील, त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी 31 जूनपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती. मात्र अद्यापही काही रस्ते पूर्ण झालेले नाहीत. आयुक्तानी अशा ठेकेदारांवार कारवाई करण्याचे सुतोवाच मध्यंतरी दिले होते. त्यातच हा रस्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामधील असूनही याठिकाणी मोठमोठ्या खड्ड्याचे साम्राज्य दिसून येत आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर या ठेकेदारांवर कशाप्रकारे कारवाई करतील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
