Dombivli Fire: डोंबिवली एमआयडीसीत कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, काळ्या धुराचे लोट गगनाला भिडले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
Dombivli MIDC Fire: आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कारखान्यात कपडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. आत अनेक गॅस सिलिंडर असल्याची माहिती समोर आली आहे.

Dombivli: डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज-1 भागात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास असणाऱ्या एरोसिल या कपड्यांच्या कारखान्यात भीषण आग लागलीय. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण कारखान्याने पेट घेतला असून परिसरात प्रचंड धुराचे लोट गगनाला भिडताना दिसत आहेत. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Dombivali MIDC Fire)
नेमकं घडलं काय?
डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-1 परिसरात असलेल्या एरोसिल या कपड्यांच्या कारखान्याला आज (मंगळवार) दुपारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत काही मिनिटांत संपूर्ण कारखाना पेटून उठला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे परिसरात प्रचंड मोठे काळ्या धुराचे लोट गगनाला भिडताना दिसून आले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी गेला. आग विझवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कारखान्यात कपडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. आत अनेक गॅस सिलिंडर असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागताच सिलिंडर तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अन्यथा मोठा स्फोट होण्याचा धोका होता.
कामगारांना बाहेर काढलं, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या कारखान्यात कोणी अडकलं आहे का, याची तपासणी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार सर्व कामगार सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरातील नागरिक व कामगार यांची गर्दी होत असल्याने पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेल्या दोन महिन्यांत ही आग लागण्याची दुसरी घटना आहे. याच भागात यापूर्वीही एका रासायनिक कंपनीत आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी भागातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा























