Dombivli Building Collapsed : डोबिंवलीमध्ये इमारत कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, एक जखमी
Dombivli Building Collapsed : डोंबिवलीत दत्तनगर परिसरात तीन मजली इमारत कोसळली आहे. दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना (Dombivli Building Collapsed) घडली आहे. डोंबिवलीत दत्तनगर परिसरात तीन मजली इमारत कोसळली आहे. दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने आधीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध आणि बचावकार्य सुरु झालं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू आणि एक जण जखमी झाला आहे.
डोबिंवलीमध्ये इमारत कोसळून दुर्घटना
डोंबिवली अहिरे रोड परिसरातील इमारत कोसळल्याची ही घटना शुक्रवारी घडली आहे. न्यू अहिरे रोडवरील आदी नारायण ही तीन मजली इमारत कोसळली. आदी नारायण इमारत धोकादायक होती. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास इमारतीला तडे गेले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेने इमारत रिकामी करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र, दोन जण इमारती खाली अडकले होते. महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक आणि अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालं होतं.
एकाचा मृत्यू, एक महिला जखमी
दीप्ती लोढाया 54 वर्षीय महिलेला इमारतीच्या ढिगार्या खालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुनील लोढाया या व्यक्तीचा इमारतीच्या ढिगार्याखाली अडकून मृत्यू झाल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
15 सेकंदापूर्वी बाहेर पडल्या आणि त्यांचा जीव वाचला
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख त्यांच्या पथकासह चार वाजण्याच्या सुमारास आदिनारायण इमारतीच्या दोन कुटुंबाना इमारत रिकामी करण्यास सांगण्यासाठी आल्या होत्या. सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आणि त्यांचे पथक इमारती बाहेर पडून काही अंतरावर गेले असतानाच ही इमारत कोसळली. सुदैवाने सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख थोडक्यात बचावल्या.
डोंबिवली पूर्वेकडील आदी नारायण इमारती लगत एक चाळ होती. या चाळीतील रहिवाशांना देखील खोल्या रिकामा करण्याचा नोटिसा देण्यात आला होत्या. इमारती लगत असलेल्या एका खोलीत शोएब मलिक हात तरून आपल्या दोन मित्रांसह राहत होता. सायंकाळी चार वाजता सुमारास हा शोएब मित्रांसह घराबाहेर पडला. अवघ्या काही मिनटात आदी नारायण इमारत पत्त्यासारखे खाली कोसळली.
राजू पाटील यांची घटनास्थळी पाहणी
आदी नारायण इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजू पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितलं. पुढे बोलताना हीच इमारत नव्हे तर, संपूर्ण डोंबिवली शहरातली ही परिस्थिती आहे. पूर्वीची डोंबिवलीच्या आजूबाजूच्या गावामध्ये याच प्रकारे डेव्हलपमेन्ट झाली त्यामुळे क्लस्टर व्यतिरिक्त उल्हासनगरच्या पार्श्वभूमीवर आणखी कुठल्यातरी योजना आणून त्यांची एक पॉलिसी बनवली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले .
महत्त्वाच्या इतर बातम्या :